ब्लाटर, प्लातिनी ९० दिवस निलंबित
By Admin | Updated: October 9, 2015 04:56 IST2015-10-09T04:56:58+5:302015-10-09T04:56:58+5:30
फिफाच्या नैतिकता समितीने गुरुवारी फुटबॉलचे दोन दिग्गज अधिकारी सेप ब्लाटर व मायकल प्लातिनी यांना ९० दिवसांसाठी निलंबित केले. बंदीचा निर्णय अस्थायी स्वरूपाचा

ब्लाटर, प्लातिनी ९० दिवस निलंबित
झुरिच : फिफाच्या नैतिकता समितीने गुरुवारी फुटबॉलचे दोन दिग्गज अधिकारी सेप ब्लाटर व मायकल प्लातिनी यांना ९० दिवसांसाठी निलंबित केले. बंदीचा निर्णय अस्थायी स्वरूपाचा असला, तरी त्यामुळे फिफाचे अध्यक्ष ब्लाटर यांच्या युगाचा अंत असल्याचे मानले जात आहे. तर, भविष्यात अध्यक्षपद भूषविण्याची तयारी करीत असलेल्या युएफचे प्रमुख प्लातिनी यांच्या इच्छेला धक्का बसला आहे.
फिफाच्या स्वतंत्र नैतिकता समितीने दक्षिण कोरियाचे दिग्गज चुंग मोंग जून यांच्यावरही सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली. मून यांचासुद्धा फिफा अध्यक्षपदाच्या दावेदारांमध्ये समावेश होता.
फिफाचे महासचिव जेरोम वाल्के यांनाही ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांना तिकीट घोटाळा प्रकरणात यापूर्वीच पदाचा राजीनामा देण्यास बजावण्यात आले होते.
प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे, की फुटबॉलच्या चार दलालांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर फुटबॉल वर्तुळातून निलंबित करण्यात आले आहे. बंदीची शिक्षा ताबडतोब लागू होईल. (वृत्तसंस्था)
आता कारभार कोण सांभाळणार, हे फिफाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. स्विस चौकशी समितीच्या सदस्यांनी ब्लाटर व प्लातिनी यांच्याविरुद्ध खराब व्यवस्थापनाची चौकशी सुरू केलेली असून, त्यांना तुरुंगवास होण्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे.
निलंबनाचा कालावधी आणखी ४५ दिवस वाढविण्यात येऊ शकतो. फिफाची निवडणूक २६ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे प्लातिनी यांच्यासाठी निवडणूक लढविणे अडचणीचे भासत आहे. चुंग शर्यतीतून बाहेर झाले आहेत.
हुंइई परिवाराचे वारसदार असलेले चुंग विश्वकप २०२२ च्या यजमानपदाच्या दक्षिण कोरियाच्या दावेदारीदरम्यान नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. चुंग यांनी या बंदीच्या विरोधात कायदेशीर कारवाईची धमकी दिलेली आहे.
फिफाला या संकटाची चाहूल मे महिन्यात लागली होती. त्या वेळी अमेरिकन अधिकाऱ्यांनी फिफाच्या १४ अधिकारी व मार्केटिंग कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रसारण व मार्केटिंग करारासाठी १५ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रकमेची लाच स्वीकारल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.
फिफाच्या सात अधिकाऱ्यांना २८ मे रोजी झुरिच येथे हॉटेलमध्ये अटक केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी ब्लाटर यांची पाचव्यांदा अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर ब्लाटर यांनी पद सोडण्याची घोषणा केली होती. प्लातिनी आणि चुंग यांनी अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी आमच्यावर फिफाच्या आतल्या गोटातून आरोप करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.