ब्लाटर यांनी पायउतार व्हावे

By Admin | Updated: May 29, 2015 01:39 IST2015-05-29T01:39:13+5:302015-05-29T01:39:13+5:30

भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक झाल्यानंतर जगभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, १७ वर्षांपासून पदावर असलेले फिफा अध्यक्ष सॅप ब्लाटर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली.

By Blatter, it may be withdrawn | ब्लाटर यांनी पायउतार व्हावे

ब्लाटर यांनी पायउतार व्हावे

झुरिच : फिफाच्या सात अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक झाल्यानंतर जगभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, १७ वर्षांपासून पदावर असलेले फिफा अध्यक्ष सॅप ब्लाटर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. ब्लाटर यांच्या दीर्घ कार्यकाळात विश्व फुटबॉलवर महासंकट ओढवल्याचा आरोप विरोधकांनी केला.
फुटबॉलच्या दिग्गज अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे फुटबॉलवर कोट्यवधी रुपये खर्च करणारे प्रायोजक कोका कोला, आदिदास, मॅक्डोनाल्ड आणि व्हिसा यांनी या खेळातील घाण दूर करण्याची मागणी केली. व्हिसा कंपनीने तर फिफा भ्रष्टाचाराचा नायनाट करणार नाही तोवर आम्ही प्रायोजित रक्कम देणार नसल्याचे स्पष्ट केले.
दुसरीकडे फिफानेदेखील झुरिचच्या आलिशान हॉटेलमध्ये पहाटे अटकसत्र झाल्यानंतरही आमची वार्षिक कॉंग्रेस आणि अध्यक्षपदाची निवडणूक पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याची घोषणा केली. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेणाऱ्या अधिकाऱ्यांसह एकूण १४ अधिकाऱ्यांवर १५ कोटी डॉलरची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास सर्वांना २० वर्षांचा कारावास होऊ शकतो. द. आफ्रिकेने २०१० च्या स्पर्धा आयोजनासाठी एक कोटी डॉलरची लाच दिली असल्याची माहिती अमेरिकेच्या तपासकर्त्यांनी दिली. २०१८ आणि २०२२ च्या विश्वचषक आयोजनासाठी रशिया तसेच कतार यांनी लाच दिल्याचा पुन्हा आरोप होताच तपास अधिकाऱ्यांनी बुधवारी झुरिच येथील फिफाच्या मुख्यालयावर धाड टाकली.
इंग्लिश फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष ग्रेग डायके म्हणाले, ‘ब्लाटर यांना फिफा अध्यक्षपदाची खुर्ची सोडावी लागेल. ब्लाटर पदावर असेपर्यंत लोकांचा फिफावर विश्वास कमीच होत जाईल. त्यांचा राजीनामा आवश्यक असल्याने मतदानादरम्यान सर्वांनी एकजूट दाखवायला हवी. ’
युरोपियन महासंघांनी (यूएफा) देखील फिफा काँग्रेस स्थगित करण्याची मागणी केली. या संपूर्ण घटनाक्रमामुळे भ्रष्टाचार फिफाच्या नसांत भिनल्याचे निष्पन्न होते, असे यूएफाने म्हटले आहे. ब्राझीलचा माजी स्टार रोमारियो म्हणाला, ‘या घटनेमुळे ब्लाटर यांची अध्यक्षपदाची पुन्हा निवडणूक जिंकण्याची आकांक्षा धुळीस मिळेल, अशी आशा आहे. ’
ब्लाटर म्हणाले, ‘फिफासाठी ही संकटाची वेळ असली, तरी कुणी वायफळ बोलत असेल तर आम्ही कदापि खपवून घेणार नाही. अशा प्रकाराच्या भ्रष्टाचारास फुटबॉलमध्ये थारा नाही. भ्रष्टाचारात गुंतलेल्यांना फुटबॉलमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात येईल, असे मी सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो.’ (वृत्तसंस्था)

उपाध्यक्ष म्हणतात,
‘मी निर्दोष’!
४फिफाचे माजी उपाध्यक्ष
७२ वर्षांचे जॅक वॉर्नर यांनी
या प्रकरणी कानावर हात
ठेवले असून, आपण निर्दोष असल्याचे सांगितले. त्रिनिदाद येथे एका वक्तव्यात ते म्हणाले, ‘फिफाशी जुळलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी माझी
कुणीही चौकशी केली नाही.’ वॉर्नर यांनी ४ वर्षांपूर्वीच पदाचा राजीनामा दिला होता. विश्व फुटबॉलमधील राजकारणापासून मी अलिप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

मीडियाकडूनही
राजीनाम्याची मागणी
भ्रष्टाचार आणि अफरातफरीच्या आरोपाखाली दिग्गज अधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर विश्व मीडियाने देखील फिफा अध्यक्ष सॅप ब्लाटर यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

अजून वाईट बातम्यांना सामोरे जावे लागेल
घोटाळ्याच्या कारणामुळे चर्चेत असलेल्या फिफाला अजून वाईट बातम्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे अध्यक्ष सेफ ब्लॅटर यांनी सांगितले.

अंडर-२0 वर्ल्डकपवर स्कँडलचा परिणाम नाही
न्यूझीलंडमध्ये पुढील ३ आठवड्यांदरम्यान होणाऱ्या अंडर २0 फुटबॉल वर्ल्डकपच्या आयोजकांनी स्वत: फिफात आलेल्या वादळापासून स्वत:ला दूर ठेवताना कोणताही परिणाम स्पर्धेवर होणार नसल्याचे स्पष्ट केले.

एएफसी ब्लाटर
यांच्या पाठीशी
आशियाई फुटबॉल संघटनेने (एएफसी) ब्लाटर यांच्या अध्यक्षपदाला पाठिंबा दिला असून, भ्रष्टाचाराशी त्यांचा काही संबंध नसल्याचेही म्हटले आहे. एएफसीत ४७ देशांचा समावेश असून, ब्लाटर यांना या देशांचा भक्कम पाठिंबा आहे. फिफा अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक झाल्याने दुखी असलो, तरी काँग्रेसमध्ये घेतलेल्या निर्णयावर तसेच ब्लाटर यांना पाचव्यांदा अध्यक्षपदी निवडून आणण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे एएफसीने गुरुवारी एका वक्तव्यात स्पष्ट केले.

झुरिच : आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघावर (फिफा) भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्यानंतर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विश्व फुटबॉल महासंघात वादळ आल्यानंतर अध्यक्ष सॅप ब्लाटर भूमिगत झाले आहेत. फिफाच्या कार्यक्रमात नेहमी उपस्थित राहणारे व मीडियासोबत चर्चा
करण्यासाठी नेहमी सज्ज असणारे ७९ वर्षीय ब्लाटर शुक्रवारी होणाऱ्या काँग्रेसपूर्वी आफ्रिकेच्या प्रतिनिधींसोबत चर्चेसाठी पुढे न आल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. ब्लाटर शुक्रवारी पाचव्यांदा फिफाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहे. त्यांना निवडणुकीत जॉर्डनचे प्रिन्स अली बिन अल हुसेनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

स्वित्झर्लंडमधील झुरिचमध्ये अमेरिका व स्विस चौकशी एजन्सींनी मोठी मोहीम राबविताना फिफाच्या सात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली. त्यात महासंघाच्या दोन उपाध्यक्षांचाही समावेश आहे. अटक करण्यात
आलेल्या पदाधिकाऱ्यांना अमेरिकेला सोपविण्याची शक्यता आहे; पण अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. फिफाने या सात अधिकाऱ्यांवर फुटबॉलबाबतच्या कुठल्याही प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी घातली आहे. त्याचसोबत २०१८ व २०२२ फुटबॉल विश्वकप स्पर्धेचे यजमानपद अनुक्रमे रशिया व कतारला सोपिवण्याच्या निर्णयाचीही चौकशी होणार आहे.

फिफाच्या १११ वर्षांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या घोटाळ्यामुळे अडचणी वाढल्या असून, विविध महासंघ एक दुसऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. युरोपियन फुटबॉल संघटनांनी शुक्रवारी होणारी निवडणूक पुढे ढकलण्याची सूचना करताना काँग्रेसमधून बहिर्गमन करण्याची धमकी दिली आहे. आॅस्ट्रेलियानेही त्याचे समर्थन केले आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता आशियाई फुटबॉल संघटनेने (एएफसी) ब्लाटर यांना पाठिंबा जाहीर केला असून, फ्रेंच फेडरेशननेही ब्लाटर यांचे समर्थन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अमेरिकेचे दडपण झुगारा : पुतिन
मास्को : अमेरिका फिफावर दडपण आणत असल्याचा आरोप रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतिन यांनी केला असून, माझ्या देशाकडून २०१८ च्या विश्वचषकाचे यजमानपद काढून घेतले जाऊ शकते, असे संकेत दिले. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या आग्रहानंतर फिफा अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरू झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत पुतिन पुढे म्हणाले, ‘कुणी चूक केली असेल तर आमचा त्यात काहीही दोष नाही. रशियाला २०१८ च्या आयोजन पदाचे यजमानपद मिळाल्यानंतर अमेरिकेद्वारा आणण्यात येणाऱ्या दडपणाबद्दल आम्ही अनभिज्ञ नाहीत.’

अध्यक्षाची निवडणूक स्थगित करा : यूएफा
वॉर्सा : भ्रष्टाचार प्रकरण चव्हाट्यावर आल्याने फिफा अध्यक्षपदाची निवड स्थगित करण्याची मागणी युरोपियन फुटबॉल परिसंघाने केली. कार्यकारी बैठकीनंतर यूएफा महासचिव जियानो म्हणाले, ‘फिफा कॉंग्रेस सध्या स्थगित करावी आणि अध्यक्षपदाची निवडणूक सहा महिन्यांत आयोजित करावी. फिफा काँग्रेसला आजपासून सुरुवात होत आहे, पण अध्यक्षपदाची निवडणूक उद्या होईल.’

जोहान्सबर्ग : २०१० च्या विश्वचषकाचे यजमानपद मिळविताना फिफा अधिकाऱ्यांना मोठी लाच दिल्याचा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगून द. आफ्रिकेने सर्व आरोप फेटाळून लावले. राष्ट्रीय फुटबॉल संघटनेचे प्रवक्ते डोमिनिक सी म्हणाले,‘एक कोटी डॉलरची लाच दिल्याच्या बिनबुडाच्या आरोपांवर आम्ही नाराज आहोत. याचे पुरावे असतील तर ते पुढे येऊ द्या. यजमानपदाची दावेदारी करणाऱ्यांमध्ये दिवंगत राष्ट्रपती नेल्सन मंडेला, माजी राष्ट्रपती थाबो एम्बेकी आणि अनेक मंत्र्यांचा समावेश होता. या सर्वांच्या प्रामाणिकपणावर शंका उपस्थित करता येणार नाही. द. आफ्रिकेच्या क्रीडामंत्र्यांनी या आरोपांवर उद्या प्रतिक्रिया देणार असल्याचे सांगितले.’
नैरोबी : भ्रष्टाचाराच्या आरोपानंतरही केनिया व पूर्व आणि मध्य आफ्रिका फुटबॉल असोसिएशनचे (सीईएएफए)
सदस्य देश फिफा अध्यक्षपदासाठी सॅप ब्लाटर यांचे समर्थन करणार आहेत.
फुटबॉल केनिया महासंघाचे (एफकेएफ) अधिकारी व त्यांचे अध्यक्ष सेम न्यामवेया शुक्रवारपासून प्रारंभ होणाऱ्या वार्षिक आम काँग्रसेसाठी सध्या झुरिचमध्ये आहेत. ब्लाटर यांचे समर्थन करण्याचा सीईसीएएफएच्या सामूहिक निर्णयावर केनिया ठाम राहणार असल्याचे प्रवक्ता म्हणाला. एफकेएफच्या सूत्राने म्हटले आहे की,‘भ्रष्टाचाराचा आरोप होण्यापूर्वीच ब्लाटर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामध्ये बदल होण्याची शक्यता नाही.’

 

Web Title: By Blatter, it may be withdrawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.