आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विघ्नेशचे कांस्यपदक
By Admin | Updated: September 30, 2016 20:18 IST2016-09-30T20:18:42+5:302016-09-30T20:18:42+5:30
नुकत्याच पार पडलेल्या पोलंड येथील आंतरराष्ट्रीय सिरीझ अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे शहरातील विघ्नेश देवळेकरने कांस्यपदकाला गवसणी घातली

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विघ्नेशचे कांस्यपदक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० : नुकत्याच पार पडलेल्या पोलंड येथील आंतरराष्ट्रीय सिरीझ अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे शहरातील विघ्नेश देवळेकरने कांस्यपदकाला गवसणी घातली. स्पर्धेत पुरुष दुहेरीत दिल्लीच्या रोहन कपूरसह खेळताना विघ्नेशने डेन्मार्कच्या मानांकित क्रितोफर क्नुडसेन-टॅबिस सुडेर जोडीचा २-० असा धुव्वा उडवला.
ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत विघ्नेशने बॅडमिंटनचे धडे गिरवले. एकेरीत उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर दुहेरीत रोहनच्या साथीने त्याने खेळास सुरुवात केली. पोलंड स्पर्धेत विघ्नेश-रोहन जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन करत पहिल्या सेटमध्ये २१-१२ असा विजय मिळवत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये क्रितोफर-टॅबिस जोडीने योग्य समन्वय दाखवत काहीअंशी प्रतिकार केला. मात्र विघ्नेश-रोहन जोडीने आक्रमक स्मॅशच्या मदतीने त्यांचा प्रतिकार २१-१६ असा मोडीत काढत सामन्यात २-० अशा फरकाने विजय मिळवला व कांस्यपदकावर नाव कोरले.
नुकत्याच झालेल्या बेल्जिअम आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत देखील विघ्नेशने चांगला खेळ करत उपांत्यपूर्व सामन्यापर्यंत मजल मारली होती.
आगामी झेकोस्लोव्हाकिया येथे होणाऱ्या राग आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विघ्नेश-रोहन जोडी आपले नशीब आजमावणार आहे. राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवल्यानंतर विघ्नेशने दुहेरी आणि मिश्र दुहेरी गटामध्ये विशेष लक्ष देत करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. विघ्नेशचे वय अवघे २० वर्षे असल्याने त्याने विजयी कामगिरीत सातत्य राखल्यास तो खुप मोठा पल्ला गाठेल, असा विश्वास प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी व्यक्त केला.