आयपीएलमधून निवृत्तीबाबत गंभीरने केलं मोठं वक्तव्य
By Admin | Updated: April 14, 2017 14:47 IST2017-04-14T14:47:05+5:302017-04-14T14:47:05+5:30
कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने दिल्ली डेअर डेव्हिल्स संघात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आयपीएलमधून निवृत्तीबाबत गंभीरने केलं मोठं वक्तव्य
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 14 - कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने दिल्ली डेअर डेव्हिल्स संघात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोलकाता संघाला आयपीएलचं दोन वेळेस विजेतेपद मिळवून देणा-या गंभीरने आपलं मन नेहमी दिल्लीच्या संघासोबत असल्याचं म्हटलं आहे.
"दिल्लीचा असल्याने माझं मन नेहमी दिल्लीसोबत असतं, ज्या संघाकडून मी सर्वप्रथम खेळलो त्या संघात परतण्याची इच्छा आहे" असं गंभीर म्हणाला. "मी 3 वर्ष दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी खेळलो, पुन्हा एकदा अगदी मनापासून आणि आनंदात मला दिल्लीसाठी खेळायला नक्कीच आवडेल, दिल्लीच्या संघाला आयपीएल चॅम्पियन बनवून मी आयपीएलमधील करिअर संपवण्याची माझी इच्छा आहे" असं गंभीर हिंदूस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
2018 मध्ये आयपीएलचं अकरावं सत्र सुरू होण्यापूर्वी सर्वच खेळाडूंचा पुन्हा लिलाव होण्याची शक्यता आहे. गंभीरच्या या वक्तव्यानंतर दिल्लीचा संघ पुन्हा गंभीरला खरेदी करून त्याची इच्छा पूर्ण करण्याची शक्यता आहे, असं झालं तर कोलकाता संघासाठी हा फार मोठा धक्का ठरेल. कारण कोलकातासाठी गंभीर सर्वात मोठा मॅच विनर ठरला आहे. आयपीएलच्या सुरूवातीच्या तीन सत्रांमध्ये गंभीर दिल्लीकडून खेळला होता त्यानंतर त्याला शाहरूख खानच्या कोलकाता संघाने खरेदी केलं, तेव्हापासून गंभीर कोलकाता संघाचं कर्णधारपद सांभाळत आहे.