‘पाकच्या राष्ट्रीय संघासाठी मोठा धक्का’
By Admin | Updated: December 28, 2015 03:30 IST2015-12-28T03:30:44+5:302015-12-28T03:30:44+5:30
आयसीसीने लेग स्पिनर यासीर शाह याच्यावर तात्पुरत्या स्वरूपाची निलंबनाची कारवाई केल्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी राष्ट्रीय संघाला मोठा धक्का बसला आहे,

‘पाकच्या राष्ट्रीय संघासाठी मोठा धक्का’
कराची : आयसीसीने लेग स्पिनर यासीर शाह याच्यावर तात्पुरत्या स्वरूपाची निलंबनाची कारवाई केल्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी राष्ट्रीय संघाला मोठा धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे निवड समितीप्रमुख हारून राशीद यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आयसीसी डोपिंगविरोधी नियमानुसार यासीर प्रकरण हाताळत आहे; त्यामुळे याबाबत कुठले वक्तव्य करणार नाही, असे पीसीबीचा प्रवक्ता म्हणाला.
पीसीबीचा प्रवक्ता म्हणाला, ‘‘आयसीसीच्या नियमानुसार सर्व प्रकिया सुरू आहे. माझ्या मते, यासीरवर तात्पुरत्या स्वरूपाची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघातील त्याच्या समावेशाची शक्यता धूसर झाली आहे.’’ पीसीबीच्या सूत्रानी सांगितले, की यासीरवर दोन वर्षांच्या निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. यासीर रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी काही औषध घेत होता. संघाचे वैद्यकीय अधिकारी व पीसीबीला याबाबत त्याने माहिती दिली नाही, ही मोठी चूक आहे.’’ संघव्यवस्थापनाने खेळाडूंनी कुठल्या आजारासाठी कुठले औषध घ्यावे, यावर लक्ष दिले नाही. त्यामुळे पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान हेसुद्धा संघव्यवस्थापनावर नाराज आहेत, असेही या सूत्राने सांगितले.
यासीरवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे निवड समितीचा वादग्रस्त वेगवान गोलंदाज मोहंमद आमिरचा न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघात समावेश करण्याचा मार्ग सुकर झाला आहे, हे विशेष.
पाकिस्तान क्रिकेटला रोज एका नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आता आम्हाला आगामी स्पर्धांसाठी साऱ्या योजना नव्याने तयार कराव्या लागणार आहेत.
- हारून राशीद, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड निवड समिती प्रमुख