बंगाल वॉरीयर्सचा थरारक विजय
By Admin | Updated: July 23, 2015 00:54 IST2015-07-23T00:54:49+5:302015-07-23T00:54:49+5:30
संपुर्ण सामन्यात दबावाखाली राहिलेल्या यजमान बंगाल वॉरियर्सने अखेरच्या काही मिनिटांमध्ये बाजी पलटवताना गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्स संघावर

बंगाल वॉरीयर्सचा थरारक विजय
कोलकाता : संपुर्ण सामन्यात दबावाखाली राहिलेल्या यजमान बंगाल वॉरियर्सने अखेरच्या काही मिनिटांमध्ये बाजी पलटवताना गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्स संघावर २८-२६ असा थरारक विजय मिळवला. निलेश शिंदे, सचिन कांबळे आणि बाजीराव होडगे यांच्या भक्कम बचावाच्या जोरावर बंगालने बाजी मारली. बंगालने पहिला विजय मिळवला असून जयपूरला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. अन्य सामन्यात बंगळुरु बुल्सने एकतर्फी झालेल्या सामन्यात पटना पायरेट्सचा ३१-२६ असा धुव्वा उडवला.
नेताजी बंदिस्त स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात अखेरच्या मिनीटाला बंगाल २६-२५ असे पिछाडीवर होते आणि पिंक पँथर्सचा केवळ समरजीत सिंग मैदानात असल्याने विजयासाठी बंगालला समरजीतची पकड करुन लोन चढवणे आवश्यक होते. या दबावाच्या क्षणी समरजीतने देखील वेळ घालवण्याचा प्रयत्न केला मात्र बंगालने समरजीतला दबावाखाली आणण्यात यश मिळवत निर्णायक पकड केली आणि जयपूर संघावर लोण चढवून थरारक विजय मिळवला.
मध्यंतराला जयपूरने १४-९ अशी आघाडी घेत सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. मात्र यानंतर बंगालने जबरदस्त पुनरागमन करताना जयपूरला दबावाखाली आणले. निलेशने तब्बल ३वेळा सुपर टॅकेल करताना जयपूरच्या चढाईपटूंना जेरीस आणले. सचिन आणि बाजीरावने देखील त्याला बचावात चांगली साथ दिली. कर्णधार दिनेश कुमार व जँग कुन ली यांनी चढाईमध्ये प्रत्येकी ३ गुण मिळवले. पराभूत जयपूरकडून जसवीर सिंगने एकाकी झुंज देत सर्वाधिक १० गुण मिळवले.
यानंतर झालेल्या सामन्यात बंगळुरु बुल्स संघाने दुसरा विजय मिळवताना पटणा पायरेट्सला सहज लोळवले. सुरुवातीपासूना आक्रमक खेळ केलेल्या बुल्सने जबरदस्त वर्चस्व राखताना पायरेट्सवर तब्बल ४ लोण चढवले. मध्यंतराला १६-८ असे वर्चस्व राखलेल्या बुल्सला दुसऱ्या सत्रात पायरेट्सने चांगली झुंज दिली. मात्र पिछाडी मोठी असल्याने पायरेट्स संघ अखेरपर्यंत दबावाखाली राहिला. दरम्यान पायरेट्सने यावेळी २ वेळा लोनची परतफेड करताना पुनरागमनासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र बुल्सने मिळवलेली पकड अखेरपर्यंत सोडली नाही. मनजीत चिल्लर सामन्यात दबदबा राखताना बंगळुरु बुल्सकडून शानदार अष्टपैलू खेळ केला.त्याला राजेश मोंडल आणि प्रदीप नरवाल यांनी आक्रमणात तर जोगिंदर नरवालने बचावामध्ये चांगली साथ दिली. दुसऱ्या बाजूला कर्णधार राकेश कुमार आणि संदीप नरवाल यांचा झुंजार अष्टपैलू खेळ पटना पायरेट्सचा पराभव टाळू शकला नाही.(वृत्तसंस्था)