तरुण खेळाडूंवर विश्वास
By Admin | Updated: December 5, 2014 00:56 IST2014-12-05T00:56:28+5:302014-12-05T00:56:28+5:30
कर्णधार महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, आर. आश्विन, रवींद्र जडेजा यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून आपले स्थान पक्के केले आहे.

तरुण खेळाडूंवर विश्वास
मुंबई : २०१५च्या विश्वचषक स्पर्धेसाठी गुरुवारी निवडण्यात आलेल्या भारताच्या संभाव्य ३० जणांच्या संघात वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, गौतम गंभीर, झहीर खान आणि हरभजनसिंग या सिनीअर खेळांडूना स्थान देण्यात आलेले नाही. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत जेतेपद कायम राखण्यासाठी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडण्यात आलेल्या या संभाव्य संघात तरुण खेळाडूंवरच विश्वास दाखविला आहे.
२०११च्या विश्वचषक विजयात सेहवाग, गंभीर व युवराज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, तर या संघात हरभजन आणि झहीर यांचाही समावेश होता. मात्र, गेल्या वर्षभरातील त्यांच्या कामगिरीवर लक्ष टाकल्यास त्यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता धूसरच होती. विशेषत: हे पाचही जण गेल्या वर्षभरापासून वन डे संघात खेळलेलेच नाहीत. याव्यतिरिक्त जलदगती गोलंदाज आशिष नेहरा व मुनाफ पटेल, फिरकीपटू पियूष चावला आणि अष्टपैलू युसूफ पठाण यांनाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बाहेरच ठेवण्यात धन्यता मानली आहे. २०११च्या विश्वचषक विजेत्या संघापैकी अनेकांना खराब कामगिरीमुळे डच्चू मिळाला आहे, तर सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली आहे आणि एस. श्रीसंत याच्यावर स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विश्वविजेत्या संघातील महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, विराट कोहली आणि आर. आश्विन यांची अॅक्शन पुन्हा पाहायला मिळेल. निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी ही घोषणा केली. जम्मू - काश्मीरचा अष्टपैलू परवेज रसूल, उत्तर प्रदेशचा फिरकीपटू कुलदीप यादव, महाराष्ट्राचा फलंदाज केदार जाधव, मनीष पांडे आणि अक्षर पटेल यांना स्थानिक क्रिकेटमधील सातत्यपूर्ण खेळीमुळे संभाव्य संघात स्थान मिळाले. संभाव्य संघात असलेल्या अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी आणि फॉर्मात असलेला फलंदाज मनोज तिवारीसह यष्टीरक्षक संजू सॅमसन यांची अंतिम १५ जणांमध्ये निवड निश्चित मानली जात आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या
अंतिम संघाची निवड करण्यात येणार आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, आर. आश्विन, रवींद्र जडेजा यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून आपले स्थान पक्के केले आहे.
गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, वरुण अॅरोन, धवल कुलकर्णी, मोहित शर्मा आणि अशोक दिंडा यांना आंतरराष्ट्रीय व स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीच्या बळावर निवडण्यात आले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)