बेल्जियमची विजयी सलामी

By Admin | Updated: June 18, 2014 06:35 IST2014-06-18T05:41:10+5:302014-06-18T06:35:35+5:30

मध्यांतरानंतर एका गोलने माघारल्यानंतरही उत्तरार्धातील दहा मिनिटांच्या खेळात दोन गोल नोंदविणाऱ्या बेल्जियम संघाने मंगळवारी फिफा विश्वचषकात अल्जीरियाचा २-१ ने पराभव करीत विजयी सलामी दिली

Belgium's winning salute | बेल्जियमची विजयी सलामी

बेल्जियमची विजयी सलामी

बेलोहोरिजोंटे : मध्यांतरानंतर एका गोलने माघारल्यानंतरही उत्तरार्धातील दहा मिनिटांच्या खेळात दोन गोल नोंदविणाऱ्या बेल्जियम संघाने मंगळवारी फिफा विश्वचषकात अल्जीरियाचा २-१ ने पराभव करीत विजयी सलामी दिली. विजयी संघाकडून दोन्ही गोल बदली खेळाडू फेलाईनीने ७० व्या मिनिटाला आणि मर्टेन्सन ८० व्या मिनिटाला केले. पराभूत अल्जीरियाकडून सोफियाने फगोऊली याने २५ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली होती.
या सामन्यात अर्ध्याहून अधिक वेळ बेल्जियमचेच वर्चस्व होते. ५६ हजार ८०० पेक्षकांच्या उपस्थितीत बेल्जियमच्या खेळाडूंनी मध्यांतरानंतर अल्जीरियाच्या कमकुवत झालेल्या बचावफळीवर वारंवार हल्ले चढविले. त्यातून त्यांना दोनवेळा गोल देखील नोंदविता आले. सामन्यात बरोबरी साधणारा गोल ७० व्या मिनिटाला मिडफिल्डर मारोने फेलाईनी याने डी ब्रूएनच्या पासवर नोंदविताच स्टेडियममध्ये उपस्थित बेल्जियमच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला तर अल्जीरियाचे चाहते सुन्न झाले होते.
यानंतर दहा मिनिटांनी हॅझर्डस्च्या पासवर ड्रिईस मर्टेन्सने दुसरा गोल नोंदविताच चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले.बेल्जियमच्या सर्वच खेळाडूंनी मर्टेन्सला गराडा घालून त्याचे कौतुक केले. अखेरच्या दहा मिनिटात बेल्जियमने चालढकल करण्याचे तंत्र अवलंबले होते. त्यात त्यांना यश आले. २-१ अशी आघाडी अखेरपर्यंत जटकल्यामुळे सामन्यात बेल्जियमची सरशी झाली.
त्याआधी, फॉरवर्ड सोफियाने फागोऊलीने नोंदविलेल्या गोलच्या जोरावर अल्जीरियाने मध्यंतरापर्यंत १-० अशी आघाडी मिळविली होती. फागोऊलीने २५ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचा लाभ घेत संघाचे खाते उघडले. कारकीर्दीतील २० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या फगोउलीचा हा सहावा आंतरराष्ट्रीय गोल ठरला.
सामन्याच्या पहिल्या सत्रात बेल्जियमच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले, पण त्यांना गोल नोंदविण्यात यश मिळाले नाही. ‘एच’ गटात बेल्जियम सर्वांत बलाढ्य संघ मानल्या जात आहे. या गटात बेल्जियम व अल्जीरिया यांच्या व्यतिरिक्त रशिया व दक्षिण कोरिया या संघांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Belgium's winning salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.