बेल्जियम-वेल्स काट्याची लढत
By Admin | Updated: June 30, 2016 05:57 IST2016-06-30T05:57:13+5:302016-06-30T05:57:13+5:30
युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील बेल्जियम विरुद्ध वेल्स हा उपांत्यपूर्व फेरीतील सामना फ्रान्समधील लिली स्टेडियमवर होणार आहे.

बेल्जियम-वेल्स काट्याची लढत
तोलोसी : युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील बेल्जियम विरुद्ध वेल्स हा उपांत्यपूर्व फेरीतील सामना फ्रान्समधील लिली स्टेडियमवर होणार आहे. हे स्टेडियम बेल्जियमच्या सीमेपासून फक्त १०० किलोमीटर अंतरावर असल्याने या सामन्यासाठी घरच्या मैदानासारखे वातावरण असेल, असे मत बेल्जियमचा केविन डी बु्रईने याने व्यक्त केले. ‘हा सामना पाहण्यासाठी बेल्जियममधून मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक येतील असे वाटते,’ असेही तो म्हणाला.
चेल्सीकडून खेळणारा आघाडीपटू बेल्जियमचा कर्णधार ईडन हजार्ड याच्या प्रेरणादायी खेळामुळे बेल्जियमने हंगेरीसारख्या बलाढ्य संघाला ४-० असे पराभूत केले. या विजयामुळे बेल्जियमचा आत्मविश्वास वाढला आहे. विजयाची हीच लय पुढील सामन्यातही कायम राहील, असे डी बु्रईनेला वाटते.
डी ब्रुईने म्हणाला, ‘‘मी या सामन्याची जास्त वाट पाहू शकत नाही. हा सामना आमच्यासाठी स्थानिक सामना असल्यासारखेच आहे. कारण येथून बेल्जियम अत्यंत जवळ आहे. येथे आमच्या देशाचे प्रेक्षक मोठ्या संख्येने येतील, असे वाटते. हा सामना आम्ही नक्की जिंकू.’’
हंगेरीविरुद्ध एकतर्फी विजय मिळविल्यामुळे संघाचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे हा संघ १९८०मधील कामगिरीची पुनरावृत्ती करेल, असा त्यांना विश्वास वाटतो. मात्र, त्या वेळी अंतिम फेरीत त्यांना जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
दुसऱ्या बाजूला वेल्सला उपउपांत्य फेरीत आयर्लंडला पराभूत करताना चांगलाच घाम गाळावा लागला होता. वेल्सचे व्यवस्थापक यांच्या मते, बेल्जियमचा संघ बलाढ्य आहे.