बीसीसीआयचा मदतीचा प्रस्ताव
By Admin | Updated: December 1, 2014 01:42 IST2014-12-01T01:42:04+5:302014-12-01T01:42:04+5:30
बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) आॅस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्यूजच्या दु:खद मृत्यूमुळे शोकाकूल असलेल्या आॅस्ट्रेलियन संघातील खेळाडूंना

बीसीसीआयचा मदतीचा प्रस्ताव
मुंबई : बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) आॅस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्यूजच्या दु:खद मृत्यूमुळे शोकाकूल असलेल्या आॅस्ट्रेलियन संघातील खेळाडूंना या धक्क्यातून सावरण्यासाठी मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आॅस्ट्रेलियन खेळाडू व काही भारतीय खेळाडूंसोबत अनौपचारिक चर्चा घडवून आणण्याचा प्रस्ताव बीसीसीआयने क्रिकेट आॅस्ट्रेलियाला दिला आहे.
ह्युजच्या पार्थिवावर बुधवारी अंतिम संस्कार होणार आहेत. त्यानंतर गुरुवारपासून ब्रिस्बेनमध्ये भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जाणारा पहिला कसोटी सामना स्थगित करण्यात आला आहे.
पहिला कसोटी सामना पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या तीन दिवसानंतर आयोजित होण्याची शक्यता असून दुसऱ्या व तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान असलेल्या ९ दिवसांचा कालावधी कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. स्थानिक सामन्यादरम्यान एबोटचा बाऊन्सर ह्युजच्या डोक्यावर आदळला. त्यात ह्युजचे निधन झाले. सर्व भारतीय खेळाडू आॅस्ट्रेलियन मित्रांच्या संपर्कात आहे. त्यामुळे बीसीसीआयने या धक्क्यातून सावरण्यासाठी क्रिकेट आॅस्ट्रेलियाला मदतीचा प्रस्ताव दिला.
बीसीसीआयचे एक अधिकारी म्हणाले, ‘आमच्या काही खेळाडूंनी आॅस्ट्रेलियन खेळाडूंसोबत संवाद साधल्यानंतर त्यांना मैदानावर परतण्यास मदत मिळणार असेल तसे करण्याची आमची तयारी आहे. बीसीसीआयने संघातील सर्व खेळाडूंना निरोप दिला आहे की, ज्या खेळाडूंना ह्युजच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहायचे असेल, त्यांना परवानगी आहे.
दरम्यान, स्थगित करण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्याबाबत आगामी २४ तासांमध्ये निर्णय घेण्यात येईल, अशी आशा बीसीसीआयने व्यक्त केली आहे. क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विविध भागीदार व खेळाडूंसोबत चर्चा केल्यानंतर सुधारित कार्यक्रम रविवारी तयार करण्यात येईल. (वृत्तसंस्था)