बीसीसीआयची एजीएम २ मार्चला चेन्नईत होणार
By Admin | Updated: February 9, 2015 02:47 IST2015-02-09T02:47:54+5:302015-02-09T02:47:54+5:30
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे अनेक वेळा स्थगित करण्यात आलेली बीसीसीआयची बहुप्रतीक्षित वार्षिक सर्वसाधारण बैठक (एजीएम) आता २ मार्चला होणार आहे

बीसीसीआयची एजीएम २ मार्चला चेन्नईत होणार
चेन्नई : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे अनेक वेळा स्थगित करण्यात आलेली बीसीसीआयची बहुप्रतीक्षित वार्षिक सर्वसाधारण बैठक (एजीएम) आता २ मार्चला होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट मंडळाच्या कामकाजावरून बनलेली अनिश्चिततेची स्थितीही समाप्त होण्याची शक्यता आहे. हा निर्णय मंडळाच्या आज येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत एन. श्रीनिवासन यांनी तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून सहभाग नोंदवला.
आजच्या बैठकीत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरही चर्चा करण्यात आली आणि कायदेशीर सल्ल्यानुसार काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच माजी क्रिकेटपटूंचे मासिक मानधन ५0 टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही रक्कम जास्तीत जास्त ५0 हजार रुपये असेल.
ही बैठक सुप्रीम कोर्टाच्या २२ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या निर्णयानंतर बोलावण्यात आली होती. न्यायालयाने आपल्या निर्णयात बीसीसीआयने सहा आठवड्यांच्या आत त्यांची सर्वसाधारण बैठक घेण्यास आणि निवडणूक घेण्यास सांगितले होते. आज झालेल्या बैठकीत विशेषत: कोर्टाच्या निर्णयावर जास्त चर्चा करण्यात आली.
दरम्यान, बीसीसीआय कार्यकारी समितीच्या सदस्यांनी रविवारी सर्वसंमतीने एन. श्रीनिवासन अॅण्ड कंपनीविरुद्ध निराधार अफवा पसरवणाऱ्या असंलग्नित क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे सचिव आदित्य वर्मा यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जावी, अशी सूचना केली. कार्यकारी समितीच्या एका सदस्याने रविवारी आदित्य वर्मा याच्या निराधार दावे करण्यावर आक्षेप घेतला आणि यावर कार्यकारी समितीने लक्ष द्यायला हवे, असे सांगितले. (वृत्तसंस्था)