‘बीसीसीआय’ने कोहलीला फटकारले

By Admin | Updated: March 5, 2015 23:25 IST2015-03-05T23:25:48+5:302015-03-05T23:25:48+5:30

एका राष्ट्रीय दैनिकाच्या पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्टार फलंदाज विराट कोहली याची चांगलीच कानउघाडणी केली आहे़

'BCCI' screamed Kohli | ‘बीसीसीआय’ने कोहलीला फटकारले

‘बीसीसीआय’ने कोहलीला फटकारले

पत्रकार शिवीगाळ प्रकरण : अशा घटनांची पुनरावृत्ती न करण्याचाही इशारा
पर्थ : एका राष्ट्रीय दैनिकाच्या पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्टार फलंदाज विराट कोहली याची चांगलीच कानउघाडणी केली आहे़ अशा घटनेची पुनरावृत्ती होता काम नये, असा इशारा मंडळाने या खेळाडूला दिला आहे़ ‘बीसीसीआय’चे नवनियुक्त सचिव अनुराग ठाकूर म्हणाले की, कोहलीला टीम इंडियाचा सन्मान राखण्याची ताकीद देण्यात आली आहे़ तसेच भविष्यात पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेण्याचेही सांगण्यात आले आहे़ केवळ कोहलीलाच नव्हे, तर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयने यापुढे जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे़
दरम्यान, एक दिवस आधी भारतीय संघ व्यवस्थापनाने या प्रकरणाला जास्त महत्त्व दिले नव्हते आणि कोहलीने सदर पत्रकाराला शिवीगाळ केलीच नाही, असा पवित्रा घेतला होता़ यानंतर पत्रकाराने कोहलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) तक्रार केली होती़
ठाकूर पुढे म्हणाले की, बीसीसीआय क्रिकेटला कव्हरेज देणाऱ्या आणि या खेळाला लोकप्रिय बनविणाऱ्या मीडियाचा सन्मान करते़ मात्र, आता या प्रकरणाला जास्त न वाढविता दोन्ही पक्षांनी सर्व काही विसरून वर्ल्डकपवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे़
दरम्यान, या राष्ट्रीय दैनिकाने आता वादावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला आहे़ या दैनिकाचे संपादक म्हणाले की, भारताचे वर्ल्डकपमधील अभियान बघता आम्ही हा वाद इथेच मिटविण्याचा निर्णय घेतला आहे़ आम्हाला नवनियुक्त सचिव अनुराग ठाकूर यांनी बरेच सहकार्य केले आहे़ याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो़ विराटचा मंगळवारी तोल सुटला. सराव सत्र आटोपल्यानंतर समोर दिसलेल्या पत्रकाराला पाहून त्याने थेट शिवराळ भाषा वापरण्यास सुरुवात केली. अनुष्का शर्माविषयी एका राष्ट्रीय दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तावरून कोहली नाराज होता. याच पत्रकाराने हे वृत्त दिल्याचा त्याचा गैरसमज झाला होता़ (वृत्तसंस्था)

वाद मिटवा-गावसकर, लक्ष्मणचे आवाहन
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याने एका राष्ट्रीय दैनिकाच्या पत्रकाराला दिलेल्या शिवीगाळप्रकरणी वाद आता संपुष्टात आणावा, असे आवाहन भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर आणि व्ही़ व्ही़ एस़ लक्ष्मण यांनी केले आहे़ गावसकर म्हणाला की, एखाद्या खेळाडूने यशाच्या शिखरावर असताना असे वर्तन करणे शोभनीय नाही़ त्यामुळे यापुढेही या स्टार खेळाडूने मीडियाशी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे़ हे प्रकरण त्वरित मिटविता आले असते़ दरम्यान, लक्ष्मण म्हणाला की, गैरसमजामधून हा प्रकार घडला होता़ यानंतर कोहलीने या पत्रकाराची माफी मागितली आहे़
त्यामुळे हा वाद जास्त न वाढविता त्वरित संपुष्टात आणायला हवा आणि खेळाडूंनी वर्ल्डकपवर लक्ष केंद्रित करावे़

Web Title: 'BCCI' screamed Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.