बीसीसीआयचे आर्थिक व्यवहार रोखणार?
By Admin | Updated: October 4, 2016 03:29 IST2016-10-04T03:29:41+5:302016-10-04T03:29:41+5:30
कोणत्याही परिस्थितीत आपल्या शिफारशींना बीसीसीआयमध्ये लागू करण्याचा निर्धार केलेल्या निवृत्त न्या. आर. एम. लोढा समितीने आता

बीसीसीआयचे आर्थिक व्यवहार रोखणार?
नवी दिल्ली : कोणत्याही परिस्थितीत आपल्या शिफारशींना बीसीसीआयमध्ये लागू करण्याचा निर्धार केलेल्या निवृत्त न्या. आर. एम. लोढा समितीने आता, बँकांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) व्यवहार रोखण्याचे निर्देश दिले आहेत.
लोढा समितीने ३० सप्टेंबरला बीसीसीआयने आपल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये (एसजीएम) घेतलेल्या आर्थिक निर्णयांना अवैध ठरवताना बँकांना बीसीसीआयसह आर्थिक व्यवहार न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच वेळी शुक्रवारी मुंबईत झालेल्या एसजीएममध्ये सदस्य क्रिकेट संघटनांनादेखील कोणतेही आर्थिक व्यवहार न करण्याचे निर्देश समितीने दिले आहेत.
दरम्यान, लोढा समितीने बीसीसीआयला आपल्या एसजीएममध्ये दैनंदिनी कार्याव्यतिरिक्त इतर कोणतेही निर्णय न घेण्याबाबत सांगितले होते. मात्र, तरीही बीसीसीआयने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यामध्ये
आर्थिक व्यवहारांचाही समावेश होता.
(वृत्तसंस्था)
चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा आयपीएल...
कोलकाता : लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले, ‘‘जर लोढा शिफारशींना लागू करण्यात आले, तर भारताला पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल.’’ लोढा शिफारशींनुसार आयपीएलच्या आधी किंवा नंतर १५ दिवसांचा रिकामा वेळ असणे आवश्यक आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी १ ते १८ जूनपर्यंत होणार असून, आयपीएल मे महिन्याच्या अंतिम दिवसांत समाप्त होण्याची अपेक्षा आहे.
‘‘मला नाही माहिती भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यायोग्य ठरेल की
नाही. जर लोढा शिफारशीनुसार जायचे ठरवल्यास, तर तुम्हाला आयपीएल व चॅम्पियन्स ट्रॉफी यापैकी एका स्पर्धेला मुकावे लागेल. त्यामुळे बीसीसीआयला यावर निर्णय घ्यावा लागेल,’’ असे ठाकूर म्हणाले. शिवाय, पाकिस्तानसह क्रिकेट खेळण्याविषयी ठाकूर म्हणाले, की
जेव्हा भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळेल तेव्हाच भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रश्न येईल.
...तरच ‘डीआरएस’ घेऊ
बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी वादग्रस्त डीआरएस प्रणाली
मान्य करण्याचे संकेत देताना सांगितले, ‘‘या प्रणालीतील त्रुटी दूर
झाल्यास आणि अचूकतेच्या जवळपास ही प्रणाली आल्यास नक्कीच आम्ही ही प्रणाली लागू करू. आम्ही पुन्हा डीआरएसचे काम पाहू. जर या प्रणालीची कामगिरी समाधानकारक राहिली, तर बीसीसीआय डीआरएसला मान्यता देईल.’’
सगळ्या शिफारशी शक्य नाही
लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी लागू करण्याबाबत जरी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले असले, तरी या शिफारशींना संपूर्णपणे लागू करणे अशक्य आहे, असे बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे मत आहे.
ठाकूर म्हणाले, ‘‘बीसीसीआयला सुधारण्यांविषयी काहीच अडचण नाही. गेल्या १८ महिन्यांत बोर्डाने क्रिकेट सल्लागार समिती नियुक्त केली, ज्यामध्ये माजी खेळाडूंचा समावेश आहे. आम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये खूप काम केले आहे. तसेच, आम्ही अनेक शिफारशी मान्य करून त्या लागूही केल्या आहेत. मात्र, काही शिफारशी लागू करता येणार नसून, आम्ही त्याची कारणेही दिले आहेत.’’