बीसीसीआयने क्रिकेटची विश्वासार्हता जपावी
By Admin | Updated: July 23, 2015 16:35 IST2015-07-23T00:51:31+5:302015-07-23T16:35:29+5:30
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी ही क्रिकेटची काळी बाजू असल्याचे मत व्यक्त करीत शैलीदार माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने

बीसीसीआयने क्रिकेटची विश्वासार्हता जपावी
मुंबई : आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी ही क्रिकेटची काळी बाजू असल्याचे मत व्यक्त करीत शैलीदार माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने बीसीसीआयने क्रिकेटचे पावित्र्य कायम ठेवण्याच्या हिताचे काम करावे, असा सल्ला दिला आहे. क्रिकेट खेळात पारदर्शीपणा असावा आणि क्रिकेट चालविणाऱ्या लोकांनी विश्वासार्हता जपावी, असेही लक्ष्मण म्हणाला.
लोढा समितीच्या निर्णयावर तुझे मत काय, असे विचारताच टाइम्स चॅनेल्सशी बोलताना लक्ष्मण म्हणाला, ‘‘आयपीएल सट्टेबाजी प्रकरण दुर्दैवी आहे. बीसीसीआय खेळाचे पावित्र्य जपण्यासाठी काम करेल, असा विश्वास वाटतो.’’
बोर्डाने लोढा समितीच्या निकालावर विचार करण्यासाठी एका कार्यसमूहाची स्थापना केली. अशा प्रकरणांमुळे लोकांचा आयपीएलबद्दलचा उत्साह कमी होईल का, असे विचारले असता लक्ष्मण म्हणाला, ‘‘कुणीही खेळापेक्षा मोठे नाही. अखेर विजय खेळाचाच होतो. हा ‘बॅडपॅच’ होता. बीसीसीआय खेळात स्वच्छता आणेल,’’ असा मला विश्वास वाटतो. ‘‘आयपीएल चांगली लीग असून खेळासाठी अशी स्पर्धा सुरू राहणे आवश्यक आहे. खेळाडूंचे लक्ष क्रिकेटवर असणे गरजेचे आहे,’’ असे लक्ष्मण म्हणाला. (वृत्तसंस्था)