बीसीसीआयला प्रामाणिक अध्यक्ष देऊ : ठाकूर
By Admin | Updated: September 28, 2015 01:39 IST2015-09-28T01:39:12+5:302015-09-28T01:39:12+5:30
जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या खुर्चीवर अनेकांचा डोळा आहे. नवा अध्यक्ष कोण असेल यावरून सुरू असलेल्या

बीसीसीआयला प्रामाणिक अध्यक्ष देऊ : ठाकूर
नवी दिल्ली : जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या खुर्चीवर अनेकांचा डोळा आहे. नवा अध्यक्ष कोण असेल यावरून सुरू असलेल्या डावपेचांच्या पार्श्वभूमीवर बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी अत्यंत सूचक संकेत दिले. बोर्डाचा नवा अध्यक्ष प्रामाणिक असेल, असे ठाकूर म्हणाले.
भारतीय क्रिकेटला सुधारणा घडवून आणणारा प्रामाणिक अध्यक्ष देऊ. जी व्यक्ती बोर्डात पारदर्शीपणा आणेल आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करून देईल, अशीच व्यक्ती प्रमुखपदी आणली जाईल, असे ठाकूर यांनी सांगितले. ठाकूर यांचे हे विधान माजी अध्यक्ष अॅड. शशांक मनोहर यांना पुन्हा अध्यक्षपदी विराजमान करण्याचे संकेत मानले जात आहेत. मनोहर हे भारतीय क्रिकेटमध्ये स्वच्छ चारित्र्य आणि पारदर्शी कारभारासाठी ओळखले जातात. दालमिया यांचे स्थान घेण्यासाठी ते एकमेव प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहेत. बोर्डाचे माजी कोषाध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के यांच्या मते, मनोहर हे शरद पवार आणि अनुराग ठाकूर यांच्या गटाचे बोर्डाच्या प्रमुखपदी एकमेव दावेदार आहेत. यासंदर्भात लवकरच घोषणा अपेक्षित आहे. मनोहर हे २००८ मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष बनले होते. (वृत्तसंस्था)