लोढा पॅनेलपुढे बीसीसीआयची बाजू मार्कंडेय काटजू मांडणार
By Admin | Updated: August 3, 2016 04:12 IST2016-08-03T04:12:34+5:302016-08-03T04:12:34+5:30
माजी न्या. मार्कंडेय काटजू यांना बीसीसीआयने लोढा पॅनलपुढे स्वत:ची बाजू मांडण्यासाठी कायदेशीर पॅनलच्या चार सदस्यीय समितीचे प्रमुख नेमले आहे.

लोढा पॅनेलपुढे बीसीसीआयची बाजू मार्कंडेय काटजू मांडणार
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. मार्कंडेय काटजू यांना बीसीसीआयने लोढा पॅनलपुढे स्वत:ची बाजू मांडण्यासाठी कायदेशीर पॅनलच्या चार सदस्यीय समितीचे प्रमुख नेमले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीच्या सुधारणा कशा लागू करता येतील, याबद्दल काटजू आणि त्यांचा चमू मार्गदर्शन करणार आहे. बीसीसीआयने मंगळवारी झालेल्या कार्य समितीच्या बैठकीत काटजू यांना चर्चेसाठी माध्यम बनविण्याचा निर्णय घेतला. काटजू हे लोढा समितीशी चर्चा करतील शिवाय जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्डाला योग्य सल्ला देतील.
काटजू यांच्याशिवाय या पॅनलमध्ये कायदेतज्ज्ञ अभिनव मुखर्जी यांचा देखील समावेश असेल. काटजू हे २००६ ते २०११ या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते. याशिवाय प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे चेअरमन राहिले. दिल्ली, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व अलाहाबाद हायकोर्टाचे कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत.
बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती देताना सांगितले की, लोढा समितीच्या शिफारशी लागू केल्यानंतर होणाऱ्या अडचणी आणि बदल याची माहिती देणारी तसेच कायदेशीर भाषा समजावून सांगणारी व्यक्ती बीसीसीआयला हवी होती. याकारणास्तव बीसीसीआयने काटजू यांना पॅनल प्रमुख बनण्याचा आग्रह केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लोढा समितीच्या शिफारशी लागू करणे अनिवार्य होऊन बसले. पुढील सहा महिन्यात शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी लोढा समिती सहकार्य करण्यास तयार आहे. बीसीसीया अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर सांगितले की, ‘‘सुचविलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिवर्तन करण्याची गरज आहे.’’ (वृत्तसंस्था)