आर्थिक व्यवहाराविषयी बीसीसीआय संभ्रमावस्थेत
By Admin | Updated: October 6, 2016 04:48 IST2016-10-06T04:48:52+5:302016-10-06T04:48:52+5:30
लोढा समितीचा अहवाल लक्षात घेता बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दोन बँकेच्या खात्यांतून कशा प्रकारे आर्थिक व्यवहार करावा, याविषयी क्रिकेट बोर्ड संभ्रमावस्थेत असल्याचे सांगितले.

आर्थिक व्यवहाराविषयी बीसीसीआय संभ्रमावस्थेत
नवी दिल्ली : लोढा समितीचा अहवाल लक्षात घेता बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दोन बँकेच्या खात्यांतून कशा प्रकारे आर्थिक व्यवहार करावा, याविषयी क्रिकेट बोर्ड संभ्रमावस्थेत असल्याचे सांगितले.
बीसीसीआय सूत्रांनी सांगितले, की या मुद्याच्या स्पष्टतेविषयी बीसीसीआयला उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. सूत्रांनुसार न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरू ठेवण्यासाठी हा मुद्दा स्पष्ट होणे आवश्यक आहे.
या अडथळ्यादरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी आज राज्य संघटनांना पत्र लिहिले आहे. न्या. लोढा समितीने येस बँक आणि बँक आॅफ महाराष्ट्रात असणाऱ्या खात्यावरील आर्थिक व्यवहाराविषयी बंदी थांबवण्यास सांगितले आहे; परंतु अजूनही बोर्ड कशा प्रकारे आर्थिक व्यवहार करू शकते, याविषयी संभ्रमावस्थेत आहे. ठाकूर म्हणाले, ‘‘प्रसिद्धीमाध्यमातील वृत्तानंतर लोढा समितीने ४ आॅक्टोबर रोजी बँक खात्यावरील आर्थिक व्यवहाराविषयी बंदी हटवण्यात आल्याचे स्पष्ट केले. समितीने फक्त नियमित आार्थिक व्यवहारास मान्यता दिली आहे; परंतु याविषयी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली नाहीत. कोणत्या आर्थिक व्यवहाराला मान्यता दिली जाईल, याविषयी खूप संभ्रम आहे आणि एवढेच नव्हे, तर समितीने राज्य संघटनांना धनराशी देऊ नये, तसेच राज्य संघटनांनी बीसीसीआयच्या निधीचा उपयोग करू नये, असे सांगितले आहे. दुर्दैवाने याचा भारत आणि बीसीसीआयच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे आणि विविध आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांतबँक खात्यावर लावण्यात आलेली रोख आणि ती हटविली जाण्याविषयी वृत्त प्रसिद्ध झाले आहे.’’
बीसीसीआयकडे कोणतेही मैदान नाही आणि सामन्यांचे आयोजन राज्य संघटना करतात. राज्य संघटनांकडे पुरेसा आर्थिक निधी नसल्यास सामन्यांच्या आयोजनात समस्या येईल, असे त्यांनी सांगितले.