फलंदाजांची शरणागती, भारत सर्व बाद २००
By Admin | Updated: January 30, 2015 12:44 IST2015-01-30T12:23:47+5:302015-01-30T12:44:22+5:30
सलामीवीर अजिंक्य रहाणे दमदार ७१ धावांची खेळी वगळता उर्वरित भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारल्याने इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यात भारताने सर्व गडी गमावत अवघ्या २०० धावा केल्या.
फलंदाजांची शरणागती, भारत सर्व बाद २००
>ऑनलाइन लोकमत
पर्थ, दि. ३० - सलामीवीर अजिंक्य रहाणे दमदार ७१ धावांची खेळी वगळता उर्वरित भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारल्याने इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यात भारताने सर्व गडी गमावत अवघ्या २०० धावा केल्या आहेत. भारताच्या सहा फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आलेली नाही.
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत शुक्रवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पर्थ येथे वन डे सामना सुरु आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन ही जोडी सलामीला उतरली. दोघांनी सावध सुरुवात करत भारताला अर्धशतकी सलामी केली. शिखर धवन ३८ धावांवर असताना ख्रिस वॉक्सने त्याचा अडसर दूर केला. गेल्या काही सामन्यांपासून शिखर धवन अपयशी ठरला असून आज चांगली सुरुवात करुनही त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात त्याला अपयश आले. शिखर धवन बाद झाला तेव्हा भारत १ बाद ८३ धावा अशा स्थितीत होता. मात्र त्यानंतर भारताची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. अजिंक्य रहाणे एका बाजूने नेटाने किल्ला लढवत असताना अन्य फलंदाजांना त्याला अपेक्षीत साथ दिली नाही. विराट कोहली ८ धावा, सुरेश रैना एक धावा, अंबाटी रायडू १२ धावा, कर्णधार महेंद्रसिंग धोनी १७ धावा, स्टुअर्ट बिन्नी ७ धावा, रविंद्र जडेजा ५ धावा आणि अक्षर पटेल १ धावांवर बाद झाला. त्यामुळे १ बाद ८३ धावा अशा स्थितीत असलेल्या भारताची अवस्था ९ बाद १६५ झाली. भारताचे आठ फलंदाज फक्त ८२ धावांमध्येच तंबूत परतले. मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा या तळाच्या जोडीने ३५ धावांची भागीदारी करत भारताला दोनशेचा टप्पा गाठून दिला.
इंग्लंडतर्फे स्टिव्हन फिनने ३ तर ख्रिस वॉक्स, स्टुअर्ट ब्रॉड, मोईन अली यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जेम्स अँडरसनने एक विकेट घेतली.