बांगलाचे पाकला चोख उत्तर
By Admin | Updated: May 2, 2015 10:20 IST2015-05-02T00:48:51+5:302015-05-02T10:20:21+5:30
तमीम इक्बाल व इमरूल कायेस यांनी नोंदविलेल्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी चौथ्या दिवशी दुसऱ्या

बांगलाचे पाकला चोख उत्तर
खुलना : तमीम इक्बाल व इमरूल कायेस यांनी नोंदविलेल्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात बिनबाद २७३ धावांची मजल मारताना पाकिस्तानला चोख उत्तर दिले.
पाकिस्तानने पहिल्या डावात ६२८ धावांची मजल मारताना २९६ धावांची आघाडी घेतली. तमीम (नाबाद १३८) व इमरूल (नाबाद १३२) यांनी वैयक्तिक शतके झळकावल्यामुळे बांगलादेशने पाकिस्तानच्या विजय मिळविण्याच्या आशा धूसर केल्या. चौथ्या दिवसअखेर पहिल्या कसोटी सामन्याची वाटचाल अनिर्णित अवस्थेकडे झुकलेली असल्याचे चित्र आहे.
बांगलादेश संघ दुसऱ्या डावात केवळ २३ धावांनी पिछाडीवर असून त्यांच्या सर्व विकेट शिल्लक आहेत. बागंलादेशने पहिल्या डावात ३३२ धावांची मजल मारली होती. तमीम व इमरूल यांनी बांगलादेशतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये कुठल्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा नवा विक्रम नोंदवला. यापूर्वीचा विक्रम मोहंमद अश्रफुल व मुशफिकर रहीम यांच्या नावावर होता. त्यांनी २०१३ मध्ये गॉल कसोटीत श्रीलंकेविरुद्ध पाचव्या विकेटसाठी २६७ धावांची भागीदारी केली होती. त्याआधी कालच्या ५ बाद ५३७ धावसंख्येवरून पुढे खेळताना पाकिस्तानचा पहिला डाव आज उपाहारापूर्वी ६२८ धावांत संपुष्टात आला.
असद शफिक (८३) व सरफराज अहमद (८२) यांनी सहाव्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी करीत पाकिस्तानला मोठी आघाडी मिळवून दिली. फिरकीपटू ताइजूल इस्लामने सकाळच्या सत्रात पाचपैकी तीन बळी घेतले. त्याने १६३ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज मोहंमद शाहीदने सरफराजला बाद करीत कारकिर्दीतील पहिला कसोटी बळी नोंदवला. ताइजूलने त्यानंतरच्या षटकात वहाब रियाजला बोल्ड केले आणि त्यानंतर यासीर शाहला बाद केले.
कारकिर्दीतील सहावा कसोटी सामना खेळणाऱ्या ताइजूलने तिसऱ्यांदा डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली. अष्टपैलू शाकीब अल-हसनने शफिकला माघारी परतवले. ताइजूलने जुल्फिकार बाबरला बाद करीत पाकिस्तानचा डाव संपुष्टात आणला. (वृत्तसंस्था)