बांगलादेशाने झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकली
By Admin | Updated: November 11, 2015 23:11 IST2015-11-11T23:11:47+5:302015-11-11T23:11:47+5:30
तमीम इक्बाल, इमरुल केज यांच्या शानदार अर्धशतकी खेळीनंतर मुशफिकर रहमान याच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा ६१ धावांनी

बांगलादेशाने झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकली
मिरपूर : तमीम इक्बाल, इमरुल केज यांच्या शानदार अर्धशतकी खेळीनंतर मुशफिकर रहमान याच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा ६१ धावांनी
पराभव केला. याच बळावर बांगलादेशाने तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत झिम्बाब्वेचा ३-० असा सफाया केला.
तमीम इक्बाल आणि इमरुल केज यांनी सलामीसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या बळावर बांगलादेशाने झिम्बाब्वेला विजयासाठी २७७ धावांचे लक्ष्य दिले होते; परंतु प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ ४३.३ षटकांत २१५ धावांत गारद झाला. झिम्बाब्वेकडून सीन विल्यम्सने सर्वाधिक ८४ चेंडूंत ५ चौकारांसह ६४ धावा केल्या. एल्टन चिगुम्बुराने ४५ व वॉलरने ३२ धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेकडून मुशफिकर रहमान याने ३४ धावांत ५ गडी बाद केले. विल्यम्सने चिगुम्बुराच्या साथीने चौथ्या गड्यासाठी ८० आणि वॉलर याच्या साथीने पाचव्या गड्यासाठी ५९ धावांची भागीदारी करताना झिम्बाब्वेच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या; परंतु विल्यम्स बाद झाल्यानंतर झिम्बाब्वेच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशनो ५० षटकांत ९ बाद २७६ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून सलामीवीर तमीम इकबाल याने ९८ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ७३ धावा केल्या. इमरुल केज याने ९५ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावांची आक्रमक खेळी केली. या दोघांशिवाय महमुदल्लाहने ४० चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ५२ व मुर्तजाने ११ चेंडूंत ३ चौकारांसह १६ धावांचे योगदान दिले. यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकर रहीम याने २५ चेंडूंत ३ चौकारांसह २८ धावा केल्या. झिम्बाब्वे संघाकडून जॉनग्वे आणि क्रेमर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. त्यांना प्यानगारा व सिकंदर रझा आणि एम. वॉलर यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. तमीम इकबाल आणि इमरुल केज यांनी बांगलादेशाला जबरदस्त सुरुवात करून देताना २९.३ षटकांत १४७ धावांची भागीदारी करूना मजबूत पायाभरणी केली. त्यानंतर महमुदल्लाह आणि मुर्तजा यांनी सातव्या विकेटसाठीत ४ षटकांत ३७ धावांची भागीदारी करताना बांगलादेशाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.(वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
५0 षटकांत ९ बाद २७६. (तमीम इक्बाल ७३, इमरुल केज ७३, महमुदल्लाह ५२, मुशफिकर रहीम २८. ल्यूक जॉनग्वे २/५0, ग्रॅमी क्रेमर २/५३, सिकंदर रजा १/४८, प्यानगारा १/४९, वॉलर १/२४).
झिम्बाब्वे : ४३.३ षटकांत सर्वबाद २१५. (विलियम्स ६४, चिगुम्बुरा ४५, वॉलर ३२, इर्व्हिन २१. मुशफिकर रहीम ५/३४)