न्यूझीलंडला फिरकीच्या बळावर नमविण्यास बांगलादेश सज्ज
By Admin | Updated: March 13, 2015 00:49 IST2015-03-13T00:49:35+5:302015-03-13T00:49:35+5:30
विश्वचषकाची पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठल्यामुळे उत्साहाला उधाण आलेला बांगलादेश उद्या (शुक्रवारी) अखेरच्या साखळी सामन्यात फिरकीचे अस्त्र

न्यूझीलंडला फिरकीच्या बळावर नमविण्यास बांगलादेश सज्ज
हॅमिल्टन : विश्वचषकाची पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठल्यामुळे उत्साहाला उधाण आलेला बांगलादेश उद्या (शुक्रवारी) अखेरच्या साखळी सामन्यात फिरकीचे अस्त्र वापरून न्यूझीलंडला नमविण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
सहयजमान असलेला न्यूझीलंड प्रचंड फॉर्ममध्ये असून, आतापर्यंतचे सर्वच सामने जिंकून हा संघ अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे बांगलादेशचे खेळाडू अॅडिलेडमध्ये इंग्लंडला नमविल्यापासून उत्साहात आहेत. न्यूझीलंडलादेखील धक्का देण्याचा त्यांचा निर्धार दिसतो. बांगलादेशने उद्या विजय मिळविला नाही तरी त्यांना उपांत्य लढतीत भारताविरुद्ध दोन हात करावे लागतील. हा सामना औपचारिकपणाचा असेल; पण दोन्ही संघांना स्वत:ची ताकद सिद्ध करायची आहे.
बांगलादेशचे सहायक कोच रुवान कल्पगे म्हणाले, ‘‘माझा संघ अखेरच्या साखळी सामन्यातही विजयी लय कायम राखण्याच्या इराद्याने खेळेल. सेडन पार्कमधील फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा माझ्या गोलंदाजांना लाभ होईल. हा सामना जिंकूनच क्वार्टरफायनल खेळण्याचा आमचा निर्धार आहे.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘माझ्या संघाने न्यूझीलंडचा कर्र्णधार ब्रँडन मॅक्यूलम याला जाळ्यात कसे ओढायचे याबद्दल डावपेच आखले आहेत. (वृत्तसंस्था)