बांगलादेश बाद फेरीत

By Admin | Updated: March 10, 2015 01:23 IST2015-03-10T01:23:16+5:302015-03-10T01:23:16+5:30

अखेरच्या क्षणापर्यंत विजयाचे पारडे दोलायमान असलेल्या लढतीत मोहंमद महमुदुल्लाच्या शतकी खेळीनंतर रुबेल हुसेनच्या अचूक

Bangladesh in the next round | बांगलादेश बाद फेरीत

बांगलादेश बाद फेरीत

अ‍ॅडलेड : अखेरच्या क्षणापर्यंत विजयाचे पारडे दोलायमान असलेल्या लढतीत मोहंमद महमुदुल्लाच्या शतकी खेळीनंतर रुबेल हुसेनच्या अचूक माऱ्याच्या जोरावर बांगलादेशने सोमवारी इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला आणि विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला. या पराभवामुळे इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
महमुदुल्लाच्या शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने ७ बाद २७५ धावांची मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंडचा डाव ४८.३ षटकांत २६० धावांत गुंडाळला. महमुदुल्ला विश्वकप स्पर्धेत शतकी खेळी करणारा बांगलादेशचा पहिला खेळाडू ठरला.
‘अ’ गटातून न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया, श्रीलंका आणि बांगलादेश संघांनी उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे; तर केवळ एक विजय मिळविणाऱ्या इंग्लंड संघाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. पाच सामने खेळणाऱ्या बांगलादेश संघाचा हा तिसरा विजय आहे. बांगलादेशतर्फे हुसेनने ९.३ षटकांत ५३ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले; तर मशर्रफ मुर्तजा व तस्कीन अहमद यांनी प्रत्येकी २ बळी घेत त्याला योग्य साथ दिली. इंग्लंडतर्फे आघाडीच्या फळीतील इयान बेल (६३ धावा, ८२ चेंडू) तर तळाच्या फळीतील बटलर व ख्रिस वोक्स (नाबाद ४२)
यांनी संघर्षपूर्ण खेळ केला, पण संघाला
विजय मिळवून देण्यात त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले.
त्याआधी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बांगलादेशातर्फे महमुदुल्लाने १०३, तर मुशफिकर रहीमने ८९ धावांची खेळी केली. नात्याने साडूभाऊ असलेले महमुदुल्ला व रहीम यांनी पाचव्या विकेटसाठी १४४ चेंडूंमध्ये १४१ धावांची भागीदारी केली. एक वेळ बांगलादेश संघाची २२व्या षटकात ४ बाद ९९ अशी अवस्था झाली होती. महमुदुल्लाच्या शतकी खेळीत ७ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. यापूर्वी बांगलादेशातर्फे विश्वकप स्पर्धेत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम तमीम इक्बालच्या नावावर होता. त्याने एका आठवड्यापूर्वी नेल्सनमध्ये स्कॉटलंडविरुद्ध ९५ धावांची खेळी केली होती.
रहीमने ७७ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी करताना ८ चौकार व १ षटकार फटकावला. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पहिल्या दोन षटकांत बांगलादेशाचे सलामीवीर इमरुल कायसे व तमीम इक्बाल यांना माघारी परतवले होते. त्या वेळी बांगलादेशाची २ बाद ८ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर सौम्या सरकार व महमुदुल्ला यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी करून डाव सावरला. सरकारने ५ चौकार व एका षटकाराच्या साह्याने ४० धावा फटकावल्या.
सरकारला जॉर्डनने बाद केले. त्यानंतर मोईन अलीने स्टार अष्टपैलू शाकीब अल् हसनला तंबूचा मार्ग दाखविला. महमुदुल्ला ४६व्या षटकात धावबाद झाला. बांगलादेशाने अखेरच्या १० षटकांत ७८ धावा फटकावल्या. इंग्लंडतर्फे जॉर्डन व अँडरसन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
(वृत्तसंस्था)

Web Title: Bangladesh in the next round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.