बांगलादेशने केली इंग्लंडची शिकार

By Admin | Updated: March 17, 2015 23:52 IST2015-03-17T23:52:14+5:302015-03-17T23:52:14+5:30

बांगलादेश वर्ल्डकपमध्ये येतो तोच मुळी प्रस्थापितांना हुसकावून लावण्यासाठी. २००७साली त्यांनी भारताला वर्ल्डकपमधून साखळी फेरीतच बाहेर काढलं.

Bangladesh made England's victims | बांगलादेशने केली इंग्लंडची शिकार

बांगलादेशने केली इंग्लंडची शिकार

काही मुलं जन्मजात उपद्रवी असतात, तसं बांगलादेशचं आहे. बांगलादेश वर्ल्डकपमध्ये येतो तोच मुळी प्रस्थापितांना हुसकावून लावण्यासाठी. २००७साली त्यांनी भारताला वर्ल्डकपमधून साखळी फेरीतच बाहेर काढलं. यंदा त्यांनी जगाला क्रिकेट शिकवणाऱ्या इंग्लंडला ‘शाळा’ शिकविली. अखेरच्या क्षणापर्यंत विजयाचे पारडे दोलायमान असलेल्या लढतीत बांगलादेशने इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ७ बाद २७५ धावांची मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंडचा डाव ४८.३ षटकांत २६० धावांत गुंडाळला. या विजयाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशने आपला प्रवेश निश्चित केला, तर इंग्लंडला स्पर्धेतील आपला गाशा गुंडाळावा लागला. साखळी फेरीतील हा सर्वांत धक्कादायक निकाल झाला असे म्हणता येईल.

रुबेल हुसेन : बांगलादेशचा जलदगती गोलंदाज रुबेल हुसेनने या सामन्यात ५४ धावा देत ४ बळी घेतले. त्याने इयान बेल आणि कर्णधार मोर्गन यांना एकाच षटकात बाद करून बांगलादेशच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मोक्याच्या क्षणी स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांनाही पाठोपाठ बाद करून विजयावर शिक्कामोर्तब केले.

मोहम्मद महमुदुल्ला : विश्वकप स्पर्धेत शतकी खेळी करणारा महमुदुल्ला बांगलादेशचा पहिला खेळाडू ठरला. शतकी खेळीत ७ चौकार व एका षट्काराचा समावेश आहे. विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशकडून मोहम्मद महमुदुल्लाने १०३ ही सर्वाेच्च धावसंख्या या सामन्यात नोंदविली. यापूर्वी तमिम इक्बालने स्कॉटलंडविरुद्ध ९५ धावांची खेळी केली होती.

मुशफकिर रहीम : मोहम्मद महमुदुल्लाचा साडूभाऊ असलेला मुशफकिर रहीमने महमुदुल्लाला चांगली साथ दिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १४४ चेंडूंमध्ये १४१ धावांची भागीदारी केली.

सहापैकी तीन : गेल्या सहा विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाला तीन वेळा साखळीतच गारद व्हावे लागले.

चारपैकी तीन : बांगलादेश संघाने इंग्लंडचा गेल्या चार एकदिवसीय लढतींमध्ये केलेला हा तिसरा पराभव ठरला.

Web Title: Bangladesh made England's victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.