बंगळुरुचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे
By Admin | Updated: May 16, 2016 05:00 IST2016-05-16T05:00:37+5:302016-05-16T05:00:37+5:30
प्रो कबड्डीच्या लिलावामध्ये इतकी मोठी रक्कम मिळेल, याची काहीच कल्पना होती.

बंगळुरुचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे
रोहित नाईक,
मुंबई- प्रो कबड्डीच्या लिलावामध्ये इतकी मोठी रक्कम मिळेल, याची काहीच कल्पना होती. सर्वाधिक किंमत मिळाल्याचा आनंद आहेच. मात्र, आता तेवढीच जबाबदारीही वाढली आहे. बंगळुरु बुल्सने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया प्रो कबड्डीतील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलेला स्टार डिफेंडर मोहित चिल्लरने ‘लोकमत’ला दिली. शुक्रवारी मुंबईत झालेल्या लिलावात बंगळुरु बुल्सने तब्बल ५३ लाखांची सर्वाधिक बोली लावून मोहितला आपल्या संघात घेतले.
दिल्लीतील निजामपूर गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेला मोहित भारतीय रेल्वेत (उत्तर-पश्चिम) नोकरी करतो. काकांमुळे कबड्डीकडे वळाल्याचे सांगताना मोहितने सांगितले, ‘आम्ही एकूण सात चुलत भाऊ असून, सहा जण कबड्डीपटू आहेत, त्यातील तिघे प्रो कबड्डी खेळत आहेत, तसेच बाकीचे तिघेही खूप मेहनत घेत असून, लवकरच तेही या लीगमध्ये येतील.’ मोहित पुढे म्हणाला, ‘मी जास्तीत जास्त ३० -४० लाखांपर्यंत अपेक्षा केली होती. एक तर मी डिफेंडर असल्याने इतक्या मोठ्या किमतीचा विचारही केला नव्हता. मात्र, जे घडले ते धक्कादायक होते. सध्या डिफेन्स खूप महत्त्वाचे झाल्याने हा फरक पडला असेल.’
भक्कम बचावाच्या जोरावर मोहित स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ यू मुंबाचा महत्त्वाचा खेळाडू ठरला होता. यापुढे मोहित बंगळुरुकडून खेळेल. याबाबत त्याने सांगितले, ‘ज्यांच्याबरोबर नेहमी खेळतो, त्यांच्यासोबतच आता पुढेही प्रो कबड्डीत खेळणार आहे, पण एक संंघ म्हणून थोडासा फरक निश्चितच पडेल. शेवटी हा खेळाचा एक भाग असल्याने सर्व विसरून खेळावेच लागणार.’