अटीतटीच्या लढतीत बंगळुरूची बाजी
By Admin | Updated: April 8, 2017 23:52 IST2017-04-08T21:55:34+5:302017-04-08T23:52:00+5:30
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली डेअरडेव्हिसवर 15 धावांनी मात केली.

अटीतटीच्या लढतीत बंगळुरूची बाजी
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 8 - शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली डेअरडेव्हिसवर 15 धावांनी मात केली. 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. दिल्लीला शेवटच्या षटकात 19 धावांची गरज असताना एकाकी झुंज देणारा रिषभ पंत बाद झाला आणि दिल्लीचे लढतीतील आव्हान संपले. दिल्लीकडून रिषभ पंतचा (57) अपवाद वगळता इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.
तत्पूर्वी कर्णधार झहीर खान आणि ख्रिस मॉरिस केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 157 धावांत रोखले. केदार जाधवचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने बंगळुरूला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. मात्र एक बाजू लावून धरणाऱ्या केदार जाधवच्या 67 धावांच्या जोरावर बंगळुरूने दीडशेपार मजल मारली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर बंगळुरूला चांगली सुरुवात करता आली नाही. कर्णधार शेन वॉटसनचा सलामीला येण्याचा प्रयोगही यशस्वी ठरला नाही. ख्रिस गेल (6) लवकर माघारी परतल्यावर बंगळुरूच्या इतर फलंदाजांनीही निराशा केली. त्यामुळे संघाचे अर्धशतक फलकावर लागण्यासाठी आठव्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली.
त्यानंतर मात्र केदार जाधवने तुफान फटकेबाजी केली. त्याने अमित मिश्राच्या एका षटकात 24 धावा वसूल केल्या. त्यामुळे बंगळुरू समाधानकारक धावसंख्या उभारेल, असे वाटले. पण केदारला (67) धावांवर बाद करत झहीर खानने बंगळुरूच्या धावसंख्येला ब्रेक लावला. अखेरीस 20 षटकात बंगळुरूला आठ बाद 157 धावाच करता आल्या. दिल्लीकडून मॉरिसने तीन, तर झहीरने दोन बळी टिपले.