धावपटूंना बॅटन सोपविण्यास बंदी; साईकडून खेळाडूंसाठी सरावाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 01:31 IST2020-05-22T01:30:49+5:302020-05-22T01:31:17+5:30
अॅथ्लेटिक्स, हॉकी, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध आणि नेमबाजीसह ११ खेळांना आऊटडोअर खेळाची परवानगी बहाल करण्यात आली.

धावपटूंना बॅटन सोपविण्यास बंदी; साईकडून खेळाडूंसाठी सरावाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरणाने(साई) खेळाडूंसाठी सरावाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात केली आहेत. यानुसार रिले सरावाच्या वेळी धावपटू बॅटन एकमेकांकडे सोपविणार नाहीत. मुष्टियोद्धे रिंगणात उतरू शकणार नाहीत. इन्डोअर बॅडमिंटन कोर्टवर एकटाच खेळाडू खेळताना दिसेल. सराव नेमका कधी सुरू होईल, हे मात्र साईने सांगितले नाही.
अॅथ्लेटिक्स, हॉकी, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध आणि नेमबाजीसह ११ खेळांना आऊटडोअर खेळाची परवानगी बहाल करण्यात आली.
भारोत्तोलक, तिरंदाज, सायकलपटू, तलवारबाज, मल्ल आणि टेबल टेनिस खेळाडू सुरक्षा उपायांसह सराव करू शकतील. याशिवाय सरावाच्या वेळी सहकारी घेता येणार नाही. जलतरण कक्षाचा वापर तूर्त बंद राहील. गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात सरावासाठी क्रीडासंकुल आणि स्टेडियम वापराची परवानगी दिली. मात्र कोरोनाच्या सावटात सराव कधी सुरू करायचा हे स्पष्ट केले नव्हते. याविषयी साईचे सचिव रोहित भारद्वाज आॅनलाईन पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘सरावाची सुरुवात स्थानिक प्रशासनाच्या परवानगीवर अवलंबून असेल. प्रत्येक वापरानंतर सरावाच्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण केले जाईल. जिमचा उपयोगदेखील टप्प्याटप्प्यात केला जाईल.’ सर्व खेळाडू आणि सहयोगी स्टाफसाठी आरोग्य सेतू अॅपचा वापर अनिवार्य असेल.(वृत्तसंस्था)