बॅडमिंटनमध्ये डबल धमका, सानिया व के. श्रीकांतला जेतेपद
By Admin | Updated: November 16, 2014 15:28 IST2014-11-16T14:38:23+5:302014-11-16T15:28:00+5:30
चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीत सानिया नेहवालने तर पुरुष एकेरीत के. श्रीकांतने विजेतेपद पटकावले आहे.

बॅडमिंटनमध्ये डबल धमका, सानिया व के. श्रीकांतला जेतेपद
>ऑनलाइन लोकमत
फुझ्झू, दि. १६ - चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी भारतीय बॅडमिंटनपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. महिला एकेरीत सानिया नेहवालने तर पुरुष एकेरीत के. श्रीकांतने विजेतेपद पटकावले आहे. .
चीनमधील फुझ्झू येथे चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धा सुरु असून रविवारी पुरुष आणि महिला एकेरी गटातील अंतिम सामना पार पडला. महिला एकेरीत भारताच्या सानिया नेहवालसमोर जपानच्या अकाने यामागूचीचे आव्हान होते. सानियाने लागोपाठ दोन सेटमध्ये यामागूचीवर मात करत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. ४२ मिनीटे चाललेल्या या सामन्यात सानियाने यामागूचीचा २१ -१२, २२-२० असा पराभव केला. यावर्षीचे सानियाचे हे तिसरे जेतेपद आहे.
सानियानंतर पुरुष एकेरीत भारताचा के. श्रीकांत आणि चीनचा लिन डान यांच्यात अंतिम सामना रंगला. पाच वेळा जगज्जेतेपद पटकावणा-या लिन डानला श्रीकांतने चांगले आव्हान दिले. हा सामना सुमारे ४६ मिनीटे सुरु होता. श्रीकांतने संयम आणि कौशल्य याचा सुरेख मिलाप साधत लिन डानला २१- १९, २१ - १७ ने पराभूत केले. बॅडमिंटनमध्ये सुपर सिरीज किंवा प्रिमीयर टुर्नामेंट सुरु झाल्यापासून भारताच्या पुरुष बॅडमिंटनपटूने सुपर सिरीजच्या विजेतेपदावर नाव कोरण्याची ही पहिलीच वेळ आहे. चायना ओपनचे जेतेपद पटकावणा-या सानिया नेहवाल व के. श्रीकांतला पारितोषिक म्हणून सात लाख डॉलर्स देण्यात आले.