कश्यपची दुखापतीमुळे माघार
By Admin | Updated: October 23, 2015 01:38 IST2015-10-23T01:38:20+5:302015-10-23T01:38:20+5:30
रंगतदार झालेल्या सामन्यातील अंतिम सेटमध्ये दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने भारताच्या पारुपल्ली कश्यपचे फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

कश्यपची दुखापतीमुळे माघार
पॅरीस : रंगतदार झालेल्या सामन्यातील अंतिम सेटमध्ये दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने भारताच्या पारुपल्ली कश्यपचे फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. अन्य एका लढतीत अजय जयरामने झुंजार खेळ करताना विजयी आगेकूच केली.
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कश्यपचा ब्रिटनच्या राजीव ओसेफ विरुध्द रंगतदार सामना झाला. राजीवने पहिला सेट जिंकून आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये कश्यपने बाजी मारत सामना बरोबरीत आणला. यावेळी कश्यप बाजी मारणार अशी शक्यता होती. मात्र, तिसऱ्या सेट दरम्यान कश्यपला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. यावेळी राजीव ४-२ असा आघाडीवर होता.
कश्यपच्या माघारीमुळे राजीवला ४४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात २१-११, १३-२१, ४-२ असे विजयी घोषित करण्यात आले. दुसऱ्या बाजूला पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या भारताच्या अजय जयरामने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना डेन्मार्कच्या हैंस क्रिस्टीयनचा २१-१८, १८-२१, २१-१८ असा पाडाव करुन दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
त्याचवेळी बुधवारी महिला गटात भारताला मोठा धक्का बसला. डेन्मार्क ओपनचे उपविजेतेपद पटकावून संभाव्य विजेत्यांमध्ये स्थान मिळवलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. चीनच्या चौथ्या मानांकित वांग शिजियान विरुध्द सिंधूला १०-२१, ११-२१ असा निराशाजनक पराभव पत्करावा लागला.