‘अझलन शाह’मध्ये भारताची कॅनडावर २ गोलने मात
By Admin | Updated: April 10, 2015 08:38 IST2015-04-10T01:38:12+5:302015-04-10T08:38:47+5:30
विजेतेपदाच्या शर्यतीतून आधीच बाद झालेल्या भारतीय संघाने आपल्यापेक्षा कमी रँकिंग असणाऱ्या कॅनडाला पराभूत करण्यासाठी चांगलीच

‘अझलन शाह’मध्ये भारताची कॅनडावर २ गोलने मात
इपोह (मलेशिया) : विजेतेपदाच्या शर्यतीतून आधीच बाद झालेल्या भारतीय संघाने आपल्यापेक्षा कमी रँकिंग असणाऱ्या कॅनडाला पराभूत करण्यासाठी चांगलीच मेहनत घ्यावी लागली आणि आज येथे २४ व्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत त्यांचा ५-३ गोलने पराभव करीत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली.
भारताकडून रूपिंदर पालसिंह (१३ वे मिनीट) आणि व्ही. आर. रघुनाथ (३२ वे मिनीट) यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल केले, तर रमणदीपसिंहने ४६ आणि ४७ व्या मिनिटाला मैदानी गोल केला. त्यानंतर सतबीरसिंहने ४९ व्या मिनिटाला आणखी एक गोल करीत भारताच्या गोलची संख्या पाचवर पोहोचवली.
जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असणाऱ्या कॅनडाकडून ओलिव्हर शोलफिल्डने ४३ व्या, जगदीश गिलने ४९ व्या आणि डेव्हिड जेम्सन याने ५२ व्या मिनिटाला गोल केले. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱ्या भारताने चेंडूवर चांगले नियंत्रण ठेवले; परंतु त्यांची कामगिरी तेवढी प्रभावी नव्हती.
नेहमीप्रमाणे याही सामन्यात भारतीय खेळाडूंनी अनेकदा गोल करण्याची संधी दवडली आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला गोल करणे सोपे गेले. कॅनडाने ४३ व्या मिनिटाला वेगवान रिव्हर्स हिटने गोल करताना भारतीय संघाला धक्का दिला. त्याचे भारतीय गोलरक्षक श्रीजेश रवींद्रनजवळ उत्तर नव्हते.
सामन्याच्या ४९ व्या मिनिटाला गिलने पेनल्टी कॉर्नरवर कॅनडासाठी दुसरा गोल केला, तर जेम्सनने ५२ व्या मिनिटाला कॅनडासाठी तिसरा गोल केला. भारत आता शनिवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध या स्पर्धेतील सर्वांत कठीण लढत खेळेल. भारताने चार लढतीत एक विजय, एक ड्रॉसह चार गुण मिळवले. त्यामुळे हा संघ रविवारी होणाऱ्या फायनलच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. (वृत्तसंस्था)