आॅस्ट्रेलियाचा दणदणीत विजय
By Admin | Updated: November 9, 2015 23:34 IST2015-11-09T23:34:06+5:302015-11-09T23:34:06+5:30
ब्रॅन्डन मॅक्युलमच्या (८०) आक्रमक खेळीनंतरही आॅस्ट्रेलिया संघाने धक्कादायक निकाल नोंदविला जाणार, याची खबरदारी घेत न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी

आॅस्ट्रेलियाचा दणदणीत विजय
ब्रिस्बेन : ब्रॅन्डन मॅक्युलमच्या (८०) आक्रमक खेळीनंतरही आॅस्ट्रेलिया संघाने धक्कादायक निकाल नोंदविला जाणार, याची खबरदारी घेत न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी २०८ धावांनी विजय मिळविला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
चौथ्या दिवसाच्या खेळात पावसाचा निर्माण झालेला व्यत्यय आणि त्यानंतर अखेरच्या दिवशी कर्णधार मॅक्युलमने केलेल्या ८० धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघ एक वेळ ही लढत अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरेल, असे वाटत होते. पण आॅस्ट्रेलियन गोलंदाजांनी अचूक मारा करीत न्यूझीलंडचा डाव ८८.३ षटकांत २९५ धावांत गुंडाळला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
आॅस्ट्रेलियातर्फे नॅथन लियोनने २१ षटकांत ६३ धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक ३ बळी घेतले. मिशेल स्टार्क (२-६९), जोश हेजलवूड (२-६८) आणि मिशेल मार्श (२-२५) यांनी प्रत्येकी २ बळी घेत त्याला योग्य साथ दिली. मिशेल जॉन्सनने एक बळी घेतला.
त्याआधी आॅस्ट्रेलियाने दिलेल्या ५०४ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने चौथ्या दिवशी ३ बाद १४२ धावांची मजल मारली होती. चौथ्या दिवशी चहापानानंतर पावसाचा व्यत्यय निर्माण झाल्यामुळे खेळ शक्य झाला नाही. अखेरच्या दिवशीही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. रॉस टेलर (२०) आणि कर्णधार मॅक्युलम (४) यांनी आज त्यापुढे खेळताना सावध पवित्रा स्वीकारला. टेलर कालच्या धावसंख्येत ६ धावांची भर घातल्यानंतर तंबूत परतला. मॅक्युलमने ८० चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने ८० धावा फटकावीत न्यूझीलंडच्या आशा कायम राखल्या. त्याने टेलरसोबत चौथ्या विकेटसाठी २९ धावांची, तर जेम्स निशामसोबत पाचव्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. मॅक्युलमचा अडथळा मार्शने दूर केला. मॅक्युलम वादग्रस्त पद्धतीने बाद झाल्यानंतर न्यूझीलंड संघाचे अन्य फलंदाज नियमित अंतरात बाद झाले. निशाम (३), बी. जे. वाटलिंग (१४), डग ब्रेसवेल (०), टीम साऊदी (५) आणि ट्रेन्ट बोल्ट (१५) यांना मोठी खेळी करता आली नाही. मार्क क्रेगने नाबाद २६ धावांची खेळी केली. आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात १६३ आणि दुसऱ्या डावात
११६ धावांची शतकी खेळी करणारा डेव्हिड वॉर्नर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. (वृत्तसंस्था)