ऑस्ट्रेलियाचा लंकेवर विजय
By Admin | Updated: March 8, 2015 17:55 IST2015-03-08T17:53:57+5:302015-03-08T17:55:43+5:30
वर्ल्डकपमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ६४ धावांनी पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

ऑस्ट्रेलियाचा लंकेवर विजय
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. ८ - वर्ल्डकपमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ६४ धावांनी पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. कुमार संगकाराच्या शतकाने ऑस्ट्रेलियासमोर तगडे आव्हान निर्माण केले खरे मात्र शेवटच्या क्षणी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अचूक मारा करत लंकेचा डाव ३१२ धावांवरच रोखला.
रविवारी वर्ल्डकपमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाची लढत श्रीलंकेसोबत झाली. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अॅरोन फिंच आणि डेव्हीड वॉर्नर ही सलामीची जोडी अवघ्या ४१ धावांमध्येच तंबूत परतली होती. मात्र स्टिव्हन स्मिथ ७२ धावा, मायकल क्लार्कच्या ६८ धावांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. ग्लेन मॅक्सवेलने ५१ चेंडूमध्ये वन डे कारकिर्दीतील आपले पहिले वहिले शतक ठोकले. शेन वॉटसनने ६७ धावांची खेळी केली. मॅक्सवेलच्या वेगवान शतकाने ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ९ गडी गमावत ३७९ धावांचा डोंगर उभा केला.
ऑस्ट्रेलियाने दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवातही निराशाजनक ठरली. लाहिरु थिरीमाने स्वस्तात बाद झाला. तिलकरत्ने दिलशान ६२ धावा आणि कुमार संगकाराचे दमदार शतकाच्या आधारे श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर दिले. या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अक्षरशः चोपले. दिलशानने मिचेल जॉन्सनच्या एकाच षटकांत सहा चौकार ठोकले. दिलशान बाद झाल्यावर महेला जयवर्धने १९ धावांवर धावबाद बाद झाला. संगकाराही १०२ धावांवर झेलबाद झाला.अँजेलो मॅथ्यूज व दिनेश चंडिमल या जोडीने फटकेबाजी करत श्रीलंकेच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. मात्र चंडिमलला पायाच्या दुखापतीमुळे ५२ धावांवर माघारी परतावे लागले. चंडिमल रिटायर्ड हर्ट झाल्यावर लंकेचा डाव कोसळला. अँजेलो मॅथ्यूजही ३५ धावांवर बाद झाला. श्रीलंकेचा डाव ४६.२ षटकांत ९ विकेट गमावत ३१२ धावांवर आटोपला. नववी विकेट गेल्यावर चंडिमल दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले. चंडिमल मैदानात येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ऑस्ट्रेलियाचा ६४ धावांनी विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले.