आॅस्ट्रेलियाचा आफ्रिकेवर थरारक विजय
By Admin | Updated: November 9, 2014 23:31 IST2014-11-09T23:31:54+5:302014-11-09T23:31:54+5:30
आॅस्ट्रेलियाने द. आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात दोन गडी राखून थरारक विजय मिळविला़

आॅस्ट्रेलियाचा आफ्रिकेवर थरारक विजय
सिडनी : जेम्स फॉल्कनरची (३ बळी) सुरेख गोलंदाजी आणि कॅमेरून व्हाईटची (३१ चेंडूंत नाबाद ४१) आक्रमक खेळी या बळावर आॅस्ट्रेलियाने द. आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात दोन गडी राखून थरारक विजय मिळविला़ या विजयासह आॅस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी बाजी मारली़
दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर क्विंटन डी कॉक (४८) आणि रिजा डेंड्रिक्स (४९) यांच्या आक्रमक खेळाचा लाभ घेता आला नाही आणि हा संघ निर्धारित षटकांत ६ बाद १४५ धावाच करू शकला़ अन्य फलंदाजांमध्ये आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरलाच नाबाद ३४ धावा करता आल्या़ इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले़
आॅस्ट्रेलियाकडून जेम्स फॉल्कनर याने २८ धावांत तीन गडी बाद केले़ त्याला साथ देत डी़ बोलिंगर, कॅमेरून बोयसे आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला़
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाची स्थिती एकवेळ ४ बाद ६२ अशी झाली होती़; मात्र व्हाईट याने संघाला संकटातून बाहेर काढताना ३१ चेंडूंत चार चौकार आणि एका षट्कारासह आक्रमक ४१ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला़ आॅस्ट्रेलियाकडून व्हाईट व्यतिरिक्त कर्णधार अॅरोन फिंच याने ३३, तर ग्लेन मॅक्सवेल २३ आणि बेन डंक याने १४ धावांचे योगदान दिले़ फिंच आणि डंक यांनी पहिल्या गड्यासाठी ४० धावांची भागीदारी रचली होती़ यानंतर निक मॅडिन्सन (४) आणि शेन वॉटसन (५) यांना मोठी खेळी करता आली नाही़ (वृत्तसंस्था) त्यामुळे संघ ४ बाद ६२ असा अडचणीत सापडला होता़
दक्षिण आफ्रिकेकडून रॉबिन पीटरसन आणि डेव्हिड वाईसे यांनी सुरेख गोलंदाजी करताना प्रत्येकी तीन गडी बाद केले,तर के़ एबोट आणि मर्चंट डी. लांगे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला़ दरम्यान, सामनावीर पुरस्काराचा मानकरी कॅमेरून व्हाईट ठरला, तर जेम्स फॉल्कनर मालिकावीर ठरला़ (वृत्तसंस्था)