आॅस्ट्रेलियाचा दमदार विजय
By Admin | Updated: March 14, 2015 23:03 IST2015-03-14T23:03:07+5:302015-03-14T23:03:07+5:30
अचूक माऱ्याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने शनिवारी विश्वकप स्पर्धेच्या ‘अ’ गटात आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात स्कॉटलंडचा ७ गडी राखून पराभव केला.

आॅस्ट्रेलियाचा दमदार विजय
गोलंदाजांचा अचूक मारा : स्कॉटलंडवर ७ गडी राखून मात
होबर्ट : वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क व पॅट कमिन्स यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने शनिवारी विश्वकप स्पर्धेच्या ‘अ’ गटात आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात स्कॉटलंडचा ७ गडी राखून पराभव केला.
कर्णधार मायकल क्लार्कने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविला. पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या या लढतीत आॅस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा डाव २५.४ षटकांत १३० धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आॅस्ट्रेलियाने विजयासाठी आवश्यक धावा १५.२ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. विश्वकप स्पर्धेत आतापर्यंत १४ सामने खेळणाऱ्या स्कॉटलंड संघाला अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. अॅडिलेडमध्ये २० मार्च रोजी खेळल्या जाणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीपूर्वी फलंदाजीचा सराव करण्यासाठी प्रयत्नशील असलेला आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने वरच्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४७ चेंडूंमध्ये ७ चौकार व २ षटकारांच्या साह्याने ४७ धावांची खेळी केली. डेव्हिड वॉर्नरने ६ चेंडूंमध्ये नाबाद २१ धावांची खेळी केली. त्यात २ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. अॅरोन फिंचने २०, तर शेन वॉटसनने २४ धावांचे योगदान दिले. जेम्स फॉकनर १६ धावा काढून नाबाद राहिला.
त्याआधी आॅस्ट्रेलियातर्फे स्टार्कने १४ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेऊन स्कॉटलंडचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्टार्कने केली कोएत्झर (०) आणि क्रेग मॅकलियॉड (२२) या सलामीवीरांना माघारी परतवले. स्टार्कने ५ सामन्यांत १६ बळी घेतले आहेत. भारताच्या मोहंमद शमीने ५ सामन्यांत १५ बळी घेतले आहेत. कमिन्सने ४२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर शेन वॉटसनने एका फलंदाजाला माघारी परतवले. स्कॉटलंडतर्फे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या मॅट मचानने ४० धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त जोश हार्वे (२६) व मायकल लिस्क (नाबाद २३) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. या दोघांनी नवव्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली. पावसाच्या व्यत्ययामुळे २५ षटकांनंतर खेळ थांबविण्यात आला. पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर आॅस्ट्रेलियाने ४ चेंडूंच्या अंतरात उर्वरित २ विकेट घेतल्या.
(वृत्तसंस्था)
स्कॉटलंड : के. कोएत्जर झे. स्मिथ गो. स्टार्क ०, सी. मॅकलियोड झे. वॉर्नर गो. स्टार्क २२, एम. मचान झे. फॉकनर गो. कमिन्स ४०, पी. मोम्मसेन झे. स्टार्क गो. वॉटसन ०, एफ. कॉलमॅन झे. क्लार्क गो. जॉन्सन ०, आर. बॅरिंग्टन झे. वॉर्नर गो. मॅक्सवेल १, एम. क्रॉस झे. हॅडिन गो. कमिन्स ९, जे. डेव्ही त्रि. गो. स्टार्क २६, आर. टेलर झे. हॅडिन गो. कमिन्स ०, एम. लिस्क नाबाद २३, आय. वॉर्डला त्रि.गो. स्टार्क ०. अवांतर : ९. एकूण : २५.४ षटकांत सर्व बाद १३०. बाद क्रम : १-८, २-३६, ३-३७, ४-५०, ५-५१, ६-७८, ७-७९, ८-९५, ९-१३०. गोलंदाजी : स्टार्क : ४.४-१-१४-४, कमिन्स ७-१-४२-३, वॉटसन ३-०-१८-१, जॉन्सन ४-१-१६-१, मॅक्सवेल ४-०-२४-१, फॉकनर ३-०-१५-०.
आॅस्ट्रेलिया : मायकल क्लार्क झे. लिस्क गो. वॉर्डला ४७, अॅरोन फिंच झे. कोलमॅन गो. टेलर २०, शेन वॉटसन झे. क्रॉस गो. डेव्ही २४, जेम्स फॉकनर नाबाद १६, डेव्हिड वॉर्नर नाबाद २१. अवांतर : ५. एकूण १५.२ षटकांत ३ बाद १३३. बाद क्रम : १-३०, २-८८, ३-९२. गोलंदाजी : वॉर्डला ५-०-५७-१, टेलर ५-०-२९-१, डेव्ही ५-१-३८-१, लिस्क ०.२-०-७-०.