आॅस्ट्रेलियाची अवस्था बिकट

By Admin | Updated: August 7, 2015 22:35 IST2015-08-07T22:35:34+5:302015-08-07T22:35:34+5:30

मिशेल स्टार्कचे सहा बळी आणि त्यानंतर डेव्हिड वॉर्नर व ख्रिस रॉजर्स या सलामीवीरांच्या शतकी भागीदारीनंतरही चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या

Australia's condition is poor | आॅस्ट्रेलियाची अवस्था बिकट

आॅस्ट्रेलियाची अवस्था बिकट

नॉटिंगहॅम : मिशेल स्टार्कचे सहा बळी आणि त्यानंतर डेव्हिड वॉर्नर व ख्रिस रॉजर्स या सलामीवीरांच्या शतकी भागीदारीनंतरही चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावातही संकटात सापडला आहे. पहिल्या डावात ६० धावांत खुर्दा उडालेल्या आॅस्ट्रेलियाने चहापानाला खेळ थांबला तेव्हा ४ बाद १३८ धावा केल्या आहेत. कर्णधार मायकल क्लार्क ० आणि अ‍ॅडम व्होजेस २ धावांवर खेळत आहेत. आॅस्ट्रेलियाचा संघ अजूनही १९३ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे सहा फलंदाज बाकी आहेत.
आॅस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ख्रिस रॉजर्सने ८३ चेंडूंत १० चौकारांसह ५२ आणि डेव्हिड वॉर्नरने ७४ चेंडूत ९ चौकार, २ षटकारांसह ६४ धावा केल्या. पहिल्या डावात ३३१ धावांनी पिछाडीवर पडलेल्या आॅस्ट्रेलियाला ख्रिस रॉजर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दुसऱ्या डावात दमदार सुरुवात करून देताना २४ षटकांत ११३ धावांची सलामी दिली; परंतु अवघ्या २५ धावांतच त्यांनी ३ मोहरे गमावले. त्यामुळे आॅस्ट्रेलियाची बिनबाद ११३ वरुन ४ बाद १३८ अशी बिकट स्थिती झाली.
बेन स्टोक याने सलामीवीरांना २५ धावांच्या अंतरात बाद करताना आॅस्ट्रेलियाला तिहेरी धक्का दिला. स्टोक्सने प्रथम ख्रिस रॉजर्सला रुटकरवी झेलबाद केले आणि त्यानंतर दोन जीवदान मिळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला ब्रॉडकडे झेल देण्यास भाग पाडताना इंग्लंडला दुसरे यश मिळवून दिले. डेव्हिड वॉर्नरला अवघ्या १० धावांवर स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर प्रथम कुकने, नंतर स्टोक्सच्या गोलंदाजीवर वॉर्नर ४२ धावांवर असताना स्लीपमध्ये बेलने त्याला जीवदान दिले होते. त्यानंतर स्टोक्सने शॉन मार्शला (२) तर पहिल्या डावातील स्टार स्टुअर्ट ब्रॉडने स्मिथला (५) बाद करीत आॅस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला.
इंग्लंडचे लक्ष अजूनही विजयाकडे असून त्यामुळे त्यांना पाच सामन्यात ३-१ ने आघाडी मिळवून पुन्हा एकदा अ‍ॅशेज आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
पहिल्या डावात इंग्लंडने काल स्टुअर्ट ब्रॉडच्या १५ धावांतील ८ बळींच्या जोरावर आॅस्ट्रेलियाला अवघ्या ६० धावांत गुंडाळले होते आणि जो रुट याच्या शतकी खेळीच्या बळावर ४ बाद २७४ धावा केल्या होत्या. जो रुट (१३०) याने यॉर्कशायरचा त्याचा सहकारी जॉनी बेयरस्टा (७४) याच्या साथीने चौथ्या गड्यासाठी १७३ धावांची भागीदारी केली होती. रुटने आज १२४ या वैयक्तिक धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली.
तथापि, रुट आज सकाळी जास्त वेळ टिकू शकला नाही आणि स्टार्कच्या गोलंदाजीवर तो यष्टीरक्षक पीटर नेव्हीलकडे झेल देऊन तंबूत परतला. त्याने १७६ चेंडूंत १९ चौकारांसह १३० धावा केल्या. कार्डिफमध्ये पहिल्या कसोटीत १३४ धावा करणाऱ्या रुटचे या मालिकेतील हे दुसरे शतक ठरले. नाईट वॉचमन मार्क वूडने २८ चेंडूंत ५ चौकारांसह ३२ धावांची खेळी केली. त्याला आणि जोस बटलर (१२) याला स्टार्कने त्रिफळाबाद केले. मोईन अली (२४ चेंडूंत ३८ धावा) याने आॅफ स्पिनर नाथन लियोनला षटकार ठोकताना इंग्लंडला ३५0 धावांचा आकडा पार करून दिला. ब्रॉडने (नाबाद २४ धावा) याने आपल्या घरच्या मैदानावर काही आकर्षक फटके मारले.

संक्षिप्त धावफलक :
आॅस्ट्रेलिया (पहिला डाव ६०). दुसरा डाव : २९ षटकात ४ बाद १३८. (डेव्हिड वॉर्नर ६४, रॉजर्स ५२. बेन स्टोक्स ३/२०, स्टुअर्ट ब्रॉड १/१५).
इंग्लंड : पहिला डाव ९ बाद ३९१ (घोषित). (जो रुट १३०, बेयरस्टा ७४, अ‍ॅलेस्टर कुक ४३, मोईन अली ३८, मार्क वूड २८, स्टुअर्ट ब्रॉड नाबाद २४. मिशेल स्टार्क ६/१११, हेजलवूड २/९७, मिशेल जॉन्सन १/१०२).

Web Title: Australia's condition is poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.