आॅस्ट्रेलियन माझ्या सल्ल्याचा मान राखतात : श्रीराम
By Admin | Updated: February 28, 2017 04:00 IST2017-02-28T04:00:11+5:302017-02-28T04:00:11+5:30
श्रीधरन श्रीरामच्या मते प्रशिक्षकाच्या नावामुळे नव्हे तर त्याच्या सल्ल्यामुळे खेळाडूंकडून मान मिळते.

आॅस्ट्रेलियन माझ्या सल्ल्याचा मान राखतात : श्रीराम
पुणे : भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात स्टीव ओकिफीच्या शानदार प्रदर्शनाचे श्रेय मिळवणाऱ्या आॅस्ट्रेलियन संघाचा फिरकी सल्लागार श्रीधरन श्रीरामच्या मते प्रशिक्षकाच्या नावामुळे नव्हे तर त्याच्या सल्ल्यामुळे खेळाडूंकडून मान मिळते.
भारताकडून ८ एकदिवसीय सामने खेळणाऱ्या श्रीरामच्या मार्गदर्शनामुळे डावखुरा फिरकीपटू ओकिफीने पहिल्या कसोटी सामन्यात ७० धावा देत १२ बळी घेतले होते. त्याच्या या कामगिरीमुळे आॅस्ट्रेलियाने ३३३ धावांनी सामना जिंकला. आॅस्ट्रेलियात श्रीरामचे नाव मोठे नव्हते. त्यामुळे त्याच्या भूमिकेत काही फरक पडला का? यावर श्रीरामने नाव महत्त्वाचे नसून तुम्ही दिलेला सल्ला महत्त्वाचा ठरतो. तुमची भूमिका महत्त्वाची ठरते.
तर्कसंगत बोललो तरच किंमतही मिळेल. सन्मानही होईल. वायफळ बोललो त्याला काहीच अर्थ उरत नाही. आॅस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे ते तुमची गोष्ट ऐकण्यास नेहमी तयार असतात. मुद्द्याची गोष्ट केली तर खेळाडू किंमत देतात. मी सर्वांशी बोलणे सुरू केले. मुख्य प्रशिक्षकांकडूनही स्वातंत्र्य मिळाले. (क्रीडा प्रतिनिधी)