ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत मैत्री शक्य नाही - विराट कोहली
By Admin | Updated: March 28, 2017 16:15 IST2017-03-28T16:15:32+5:302017-03-28T16:15:32+5:30
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये अनेकदा बाचाबाची पाहायला मिळाली.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत मैत्री शक्य नाही - विराट कोहली
>ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 28 -भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये अनेकदा बाचाबाची पाहायला मिळाली. मैदानावर जितकं वातावरण गरम होतं तितकंच मैदानाच्या बाहेरही होतं. पण आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मित्र मानत नाही असं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला. चौथ्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत विराट बोलत होता.
मालिकेत 2-1 ने विजय मिळवल्यानंतर आता स्टीव्ह स्मिथ आणि ऑस्ट्रेलियन संघासोबत मैत्रीची नवी सुरूवात करणार का असं विचारलं असता नाही आता आधीसारखं काही राहिलं नाहीये, मीही आधी असाच विचार करायचो पण आता सर्व बदललं आहे. पहिल्या कसोटीनंतर मी जे बोललो होतो त्याबाबत मी पूर्णत: चुकीचा सिद्ध झालो. खेळाच्या वातावरणात तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून खेळायचं असतं, पण मी चुकीचा ठरलो. पहिल्या कसोटीनंतर मी जे बोललो होतो तसं पुन्हा बोलताना तुम्ही मला पाहणार नाही, असं कोहली म्हणाला.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयाने आनंदीत झालेल्या कर्णधार विराट कोहलीने हा आतापर्यंतचा सर्वोत्तम मालिका विजय असल्याचे म्हटले. मालिकेमध्ये दोन्ही संघांमध्ये झालेल्या शाब्दीक वादावादीबद्दल बोलताना कोहली म्हणाला की, कोणी आम्हाला डिवचले तर, आम्ही उत्तर देणारच. आम्ही शिखरावर असू किंवा नसू कोणी आम्हाला डिवचले तर, आम्ही उत्तर देणारच. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे विराटला चौथ्या कसोटीत खेळता आले नाही.
बंगळुरुच्या दुस-या कसोटीत डीआरएसवरुन कोहलीने ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथला लक्ष्य केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसारमाध्यमांनी कोहलीला टार्गेट केले होते. माझ्याबद्दल काय लिहीले जाते किंवा बोलले जाते याचा मी विचार करत नाही. काही लोकांना जगाच्या कुठल्या तरी एका भागामध्ये बसून मसाला तयार करायचा असतो. त्यांना परिस्थितीशी समोरुन सामना करायचा नसतो. घरी बसून ब्लॉगवर लिहीणे किंवा माइकवर बोलणे सोपे आहे पण तेच मैदानावर फलंदाजी-गोलंदाजी करणे पूर्णपणे वेगळे आहे असे कोहलीने सांगितले. मी या मालिकेत चांगली कामगिरी केली नाही, त्यामुळे प्रत्येकाला माझ्याबद्दल भरपूर बोलण्याची संधी आहे. पण त्याबद्दल माझी काही तक्रार नाही असे विराट म्हणाला.