Australian Open 2025 Novak Djokovic vs Carlos Alcaraz : ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील क्वार्टर फायनल लढतीत नोव्हाक जोकोविचनं युवा कार्लोस अल्काराझचा खेळ खल्लास केला. २५ व्या ग्रँडस्लॅमच्या दिशेनं आगेकूच करताना पुन्हा एकदा जोकोविचनं डोळ्याचं पारणं फेडणारा खेळ दाखवला. मांडीला दुखापत झालेली असताना त्याने अनुभवाच्या जोरावर सळसळत्या रक्ताच्या युवा पोराला धोबी पछाड दिली. सर्बियन टेनिस स्टारनं स्पॅनिश खेळाडूला ४-६, ६-४, ६-३, ६-४ असे पराभूत करत सेमी फायनल गाठली.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
युवा जोश अन् अनुवाची शिदोरी! दोघांच्यातील लढत एकदम भारी
कार्लोस अल्काराझ यानं पहिला सेट ६-४ असा नावे केल्यावर जोकोविच मागे पडतोय की, काय असं वाटत होते. पण तो जोकोविच आहे. मांडीला दुखापत झाली असताना त्याने दमदार खेळ करत दुसरा सेट ६-४ असा नावे करत आधी सामन्यात बरोबरी केली. मग उर्वरित दोन सेट आपल्या नावे करत युवा पोराचा खेळ खल्लास केला. सेटमधील स्कोअर पाहिल्यावर सामना जोकोविचच्या बाजूनं एकतर्फी झालाय असं वाटतं. पण इथं दिसतं तसं नसतं असा सीन आहे. कारण दोघांच्यातील लढत खूपच भारी अन् रंगतदार झाली. दोघांनी गेममध्ये कमालीच्या रॅलीसह प्रेक्षकांच्या डोळ्याचं अक्षरश: पारणं फेडलं.
तिसऱ्या सेटमधील दोघांच्यातील रॅलीला तोड नाही, जिथं फायनल जोकोविचनं मारली बाजी
नोव्हाक जोकोविच आणि अल्काराझ यांच्यातील प्रत्येक सेटमध्ये जबरदस्त रॅली पाहायला मिळाली. काही रॅलीनंतर तर प्रेक्षकांनी उभे राहून खेळाडूंच्या खेळाला दाद दिल्याचे पाहायला मिळाले. या लढतीत तिसऱ्या सेटमध्ये जोकोविच आणि अल्काराझ यांच्यात जी रॅली पाहायला मिळाली ती अफलातून अशी होती. ज्यात जोकोविचनं बाजी मारली.