आॅस्ट्रेलियाने चारली विंडीजला धूळ
By Admin | Updated: June 7, 2015 12:34 IST2015-06-07T00:59:45+5:302015-06-07T12:34:15+5:30
दुसऱ्या डावात वेस्ट इंडीजच्या फलंदाजीचा क्रम उद्ध्वस्त करताना आॅस्ट्रेलियाने विंडसर पार्क स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या

आॅस्ट्रेलियाने चारली विंडीजला धूळ
रोसेयू : दुसऱ्या डावात वेस्ट इंडीजच्या फलंदाजीचा क्रम उद्ध्वस्त करताना आॅस्ट्रेलियाने विंडसर पार्क स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळ संपण्याआधी यजमान संघाला ९ गडी राखून धूळ चारताना दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
शेन दौरीच आणि मर्लोन सॅम्युअल्स यांनी चौथ्या गड्यासाठी १४४ धावांची भागीदारी करीत सामना चौथ्या दिवसापर्यंत खेचण्याचा प्रयत्न केला; परंतु चहापानाच्या दहा मिनिटे आधी दौरीच (७०) बाद झाल्यानंतर वेस्ट इंडीजचा डाव ढेपाळला आणि त्यांचे अखेरचे सात फलंदाज धावफलकात अवघ्या ३५ धावांची भर घालून तंबूत परतले. त्यामुळे कॅरेबियन संघाचा दुसरा डाव २१६ धावांत आटोपला.
दुसऱ्या नव्या चेंडूने मिशेल स्टार्कने चार गडी बाद करताना विंडीज संघाची कंबर तोडली. त्याने सलग दोन चेंडूंवर अखेरच्या फलंदाजांना तंबूत धाडले. आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात १७० धावांची आघाडी मिळवली होती. कॅरेबियन संघ २१६ धावांत गारद केल्यानंतर आॅस्ट्रेलियाला विजयासाठी ४७ धावांची गरज होती आणि त्यांनी हे लक्ष्य अवघ्या ५ षटकांत एक फलंदाज गमावून गाठले. आॅस्ट्रेलियाने एकमेव बळी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या (२० चेंडूत २८ धावा) रूपात गमावला.
दुसऱ्या डावात वेस्ट इंडीजचा सर्वात अनुभवी फलंदाज सॅम्युअल्सने ७४ धावांचे योगदान देताना डोरीच याच्या साथीने संघाचा डावाने पराभव टाळला. डोरीच बाद झाल्यानंतर तोही लगेच तंबूत परतला. त्यानंतर आॅस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्चस्व राखले व कोणत्याही परिस्थितीत ते सामना तिसऱ्या दिवसा अखेरपर्यंत खेचू इच्छित नसल्याचे वाटत होते.
धावफलक
वेस्ट इंडीज : पहिला डाव १४८. आॅस्ट्रेलिया : पहिला डाव ३१८. वेस्ट इंडीज : दुसरा डाव : के. ब्रेथवेट त्रि. गो. स्टार्क १५, एस. होप झे. क्लार्क गो. जॉन्सन २, डी. ब्राव्हो झे. वॉर्नर गो. हेजलवूड ५, एस. डोरीच झे. व गो. हेजलवूड ७०, एम. सॅम्युअल्स झे. स्टार्क गो. जॉन्सन ७४, जे. ब्लॅकवूड यष्टि. हॅडीन गो. लियोन १२, दिनेश रामदिन त्रि.गो. लियान ३, जे. होल्डर नाबाद १२, जे. टेलर पायचीत गो. स्टार्क ०, डी. बिशू त्रि.गो. स्टार्क १, एस. गॅब्रियल त्रि.गो. स्टार्क ०, अवांतर : २२. एकूण : ८६ षटकांत २१६. गडी बाद क्रम : १-२१, २-२१, ३-३७, ४-१८१, ५-१९८, ६-१९८, ७-२०६, ८-२0६, ९-२१६, १०-२१६.
गोलंदाजी : जॉन्सन १५-३-३८-२, हेजलवूड १६-७-१७-२, स्टार्क १८-७-२८-४, लियोन २४-७-६७-२, वॉटसन ७-३-६-०, स्मिथ २-०-१६-०, वोग्स २-०-१५-०, क्लार्क २-०-८-०. आॅस्ट्रेलिया : दुसरा डाव : डेव्हिड वॉर्नर झे. ब्राव्हो गो. टेलर २८, एस. मार्श नाबाद १३, एस. स्मिथ नाबाद ५, अवांतर : १, एकूण : ५ षटकांत १ बाद ४७. गडी बाद क्रम : १-४२, गोलंदाजी : टेलर ३-०-२२-१, गॅब्रियल २-०-२५-०.