पुणे कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड, भारताच्या फलंदाजांनी टाकल्या नांग्या

By Admin | Updated: February 24, 2017 17:27 IST2017-02-24T17:27:48+5:302017-02-24T17:27:48+5:30

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या दुस-या कसोटीच्या दुसरा दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर

Australia take hold of Pune Test, Nangya bats in India | पुणे कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड, भारताच्या फलंदाजांनी टाकल्या नांग्या

पुणे कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड, भारताच्या फलंदाजांनी टाकल्या नांग्या

>ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. 24 -  भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या दुस-या कसोटीच्या दुसरा दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. दुस-या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 बाद 143 धावा केल्या. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर त्यांच्याकडे आतापर्यंत 298 धावांची आघाडी आहे. मैदानावर सध्या कर्णधार स्मिथ (59) आणि मिचेल मार्श (21) धावांवर नाबाद आहेत. भारताकडून अश्विनने 3 विकेट तर जयंत यादवने एक विकेट घेतली.
 
त्यापुर्वी आजच्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर कालच्या धावसंख्येत अवघ्या 4 धावांची भर घालत स्टार्क 61 धावांवर बाद झाला आणि कांगारूंचा डाव 260 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या भारताच्या सर्वच फलंदाजांनी आज निराशा केली. ऑस्ट्रेलियाने भारताचा पहिला डाव केवळ 105 धावात गुंडाळला. ऑस्ट्रेलियाचा नवखा डावखुरा फिरकी गोलंदाज ओकेफीच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. अवघ्या 35 धावा देत त्याने भारताचे सहा गडी बाद केले.  भारताकडून सलामीवीर लोकेश राहुलचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. भारताचा कर्णधार विराट कोहलीला मिचेल स्टार्कने खातंही खोलू न देता स्लिपमध्ये उभ्या असलेल्या हॅन्डकॉम्बच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. केवळ 45 धावांच्या आत भारताचे तीन फलंदाज तंबूत परतल्यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य राहाणेने अर्धशतकी भागीदारी रचली.  दोघे भारताचा डाव सावरणार असे वाटत असतानाच ओकेफीच्या गोलंदाजीवर राहुलने वॉर्नरकडे सोपा झेल दिला. त्याने (64) धावा केल्या. राहुल बाद झाल्यानंतर भारताची घसरगुंडी उडाली. त्याच षटकात अजिंक्य राहाणे (13), वृद्धीमान सहा (0) बाद झाले. पुढच्याच षटकात अश्विनला  (1) रन्सवर लेयॉनने बाद केले. जयंत यादवही आल्यापावली माघारी परतला. (2) धावांवर ओकेफीच्या गोलंदाजीवर तो यष्टीचीत झाला. 
 
भारताचा पहिला डाव 105 धावात गुंडाळणा-या ऑस्ट्रेलियाचीही सुरूवात वाईट झाली.  धावफलकावर संघाच्या 25 धावा लागण्याआधीच त्यांचे दोन फलंदाज तंबूत परतले. सलामीवीर डेविड वॉर्नरला अश्विनने 10 धावांवर पायचीत केले. त्यानंतर शॉन मार्शला भोपळाही फोडू न देता अश्विनने पायचीत केले. त्यानंतर स्मिथला साथ द्यायला मैदानावर आलेले हॅन्ड्सकॉम्ब(19) आणि रेनशॉ(31) हे  स्थिरावत आहेत असं वाटत असताना अनुक्रमे अश्विन आणि जयंत यादवने त्यांना बाद केले. सध्या कर्णधार स्मिथ (59) आणि मिचेल मार्श (21) धावांवर नाबाद असून ऑस्ट्रलियाकडे  298 धावांची आघाडी आहे. 
 
 

Web Title: Australia take hold of Pune Test, Nangya bats in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.