आॅस्ट्रेलिया ‘अ’ मजबूत स्थितीत
By Admin | Updated: July 31, 2015 00:46 IST2015-07-31T00:46:09+5:302015-07-31T00:46:09+5:30
कामचलावू फिरकीपटू बाबा अपराजितने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत प्रथमच पाच बळी घेण्याची कामगिरी केली असली, तरी आॅस्ट्रेलिया ‘अ’ने सलामीवीर कॅमरून बॅनक्रॉफ्टच्या शतकाच्या

आॅस्ट्रेलिया ‘अ’ मजबूत स्थितीत
चेन्नई : कामचलावू फिरकीपटू बाबा अपराजितने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत प्रथमच पाच बळी घेण्याची कामगिरी केली असली, तरी आॅस्ट्रेलिया ‘अ’ने सलामीवीर कॅमरून बॅनक्रॉफ्टच्या शतकाच्या जोरावर भारत ‘अ’ विरुद्ध दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात मोठी आघाडी घेतलीे.
बॅनक्रॉफ्टने एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये १५० धावांची दमदार खेळी केली. त्याने कर्णधार उस्मान ख्वाजासोबत (३३) सलामीला १११ धावांची, तर कॅलम फर्ग्युसनसोबत (५४) चौथ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ९ बाद ३२९ धावांची मजल मारताना १९४ धावांची आघाडी घेतली. कसोटी कर्णधार विराट कोहली व सिनिअर फलंदाज चेतेश्वर पुजारा यांच्या उपस्थितीनंतरही भारत ‘अ’चा पहिला डाव १३५ धावांत संपुष्टात आला होता. अपराजितने ७४ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. ओझाने ९९ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजांना माघारी परतवले.
आॅस्ट्रेलिया ‘अ’ने बिनबाद ४३ धावसंख्येवरून पुढे खेळताना सावध फलंदाजी केली. ओझाने ख्वाजाला पायचीत केले. त्यानंतर त्याने जो बेर्न्स (८) व पीटर हँड््सकाम्ब (०) यांना तंबूचा मार्ग दाखवत भारताला पुनरागमन करण्याची संधी दिली.
दडपणाखाली भारतीय गोलंदाजांना अपेक्षित यश लाभले नाही. फर्ग्युसनने बॅनक्राफ्टला चांगली साथ देत शतकी भागीदारी नोंदवली. श्रेयस गोपालने फर्ग्युसनला माघारी परतवले. त्यानंतर अपराजितने मार्क्स स्टोनिस (१०), मॅथ्यू वॅड (११) व बॅनक्रॉफ्ट यांना बाद केले. बॅनक्रॉफ्टने २६७ चेंडूंना सामोरे जाताना १६ चौकार व १ षटकार लगावला. त्यानंतर स्टिव्ह ओकैफीने संयमी फलंदाजी केली, तर गुरविंदर संधूने आक्रमक पवित्रा घेतला. संधला अपराजितने बाद केले. त्याने २७ चेंडूत २ चौकार व ४ षटकार खेचत ३६ धावा फटकावल्या. अपराजितने एस्टन एगरला (६) माघारी परतवत आपला पाचवा बळी घेतला. आजचा खेळ थांबला त्या वेळी कोकैफी (६) व अॅण्ड्य्रू फेकेट (०) खेळपट्टीवर होते. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
भारत अ पहिला डाव : १३५ सर्वबाद.
आॅस्ट्रेलिया अ पहिला डाव : ९ बाद ३२९. बॅनक्रॉफ्ट १५०, उस्मान ख्वाजा ३३, फर्गसन ५४, संधु ३६. प्रग्यान ओझा ३/३२, बाबा अपराजीत ५ /२३ गोपाल १/ २२.