आॅस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आमनेसामने
By Admin | Updated: January 28, 2015 02:07 IST2015-01-28T02:07:38+5:302015-01-28T02:07:38+5:30
यजमान आॅस्ट्रेलियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीवर (यूएई) २-० ने मात करून आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली़

आॅस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आमनेसामने
न्यूकॅसल : यजमान आॅस्ट्रेलियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीवर (यूएई) २-० ने मात करून आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली़ आता फायनलमध्ये आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया जेतेपदासाठी झुंजणार आहेत.
आॅस्ट्रेलियाने ४ वर्षांपूर्वी स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळविला होता; मात्र त्यांना जपानकडून पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीत कोरियाला धूळ चारून जेतेपद मिळविण्याची संधी आॅस्ट्रेलियाला आहे़
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाने इराकवर २-० असा विजय मिळवून अंतिम फेरी गाठली़ विशेष म्हणजे, दक्षिण कोरियाने तब्बल २७ वर्षांनंतर स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे़
आॅस्ट्रेलियाकडून ट्रेंट सेंसबरीने सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली, तर जेसन डेव्हिडसन याने ११व्या मिनिटाला २-० अशी आघाडी मिळवून दिली़ हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली़
दक्षिण कोरियाचा ली जियोंग हियोप याने सामन्याच्या २०व्या मिनिटाला गोल नोंदविला, तर डिफेंडर किम यंग ग्वोन याने ५०व्या मिनिटाला गोल नोंदविताना संघाला २७ वर्षांनंतर स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला़ दक्षिण कोरियाने यापूर्वी १९६०मध्ये स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते़(वृत्तसंस्था)