आॅस्ट्रेलियाचा मालिका विजय
By Admin | Updated: December 30, 2015 03:13 IST2015-12-30T03:13:40+5:302015-12-30T03:13:40+5:30
आॅस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा दुसऱ्या कसोटी सामन्यात १७७ धावांनी पराभव केला आणि फ्रँक वॉरेल चषकावर नाव कोरले. आॅस्ट्रेलिायने होबार्टमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव २१२ धावांनी

आॅस्ट्रेलियाचा मालिका विजय
मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा दुसऱ्या कसोटी सामन्यात १७७ धावांनी पराभव केला आणि फ्रँक वॉरेल चषकावर नाव कोरले. आॅस्ट्रेलिायने होबार्टमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव २१२ धावांनी विजय मिळवला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात मंगळवारी चौथ्या दिवशी वेस्ट इंडीजचा दुसरा डाव २८२ धावांत गुंडाळत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी आॅस्ट्रेलियाने दुसरा डाव ३ बाद १७९ धावसंख्येवर घोषित करीत विंडीजपुढे ४६० धावांचे आव्हान ठेवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजने चहापानापर्यंत ४ बाद १४६ धावांची मजल मारली होती. कर्णधार जेसन होल्डर व माजी कर्णधार दिनेश रामदिन यांनी सहाव्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली, पण अखेरच्या चार विकेट झटपट माघारी परतल्यामुळे निर्धारित वेळेच्या १.३ षटकांपूर्वीच विंडीजला पराभवाला सामोरे जावे लागले. होल्डरने ८६ चेंडूंना सामोरे जाताना ६८ धावा फटकावल्या, तर रामदिनने ९० चेंडूंमध्ये ५९ धावांची खेळी केली. रामदिनची ही गेल्या दोन वर्षांतील सर्वोत्तम खेळी ठरली.
आॅस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला फिरकीपटू नॅथन लियोन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने सात बळी घेतले. अष्टपैलू मिशेल मार्शने दुसऱ्या डावात ६१ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. पहिल्या डावात ५९ धावा फटकावणारा कार्लोस ब्रेथवेट दुसऱ्या डावात २ धावा काढून बाद झाला. त्याला लियोनने माघारी परतवले. कर्णधार होल्डरला मार्शने तंबूचा मार्ग दाखवला. केमार रोच (११) याला पेटिन्सनने, तर जेरोम टेलरला (००) मार्शने बाद केले.
विंडीजने उपाहारानंतर डॅरेन ब्राव्हो, राजेंद्र चंद्रिका आणि मर्लोन सॅम्युअल्स यांच्या विकेट गमावल्या. पहिल्या डावात ८१ धावांची खेळी करणारा ब्राव्हो २१ धावा काढून बाद झाला.
चंद्रिकाने ३७ धावा केल्या. त्याआधी, आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथने दुसरा डाव कालच्या ३ बाद १७९ धावसंख्येवर घोषित केला. स्मिथने नाबाद ७० धावांची खेळी केली. स्मिथ २०१५ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज ठरला. त्याने ७३.७० च्या सरासरीने १४७४ धावा फटकावल्या. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जो रुट अहे. त्याने १३७२ धावा फटकावल्या आहेत. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
पहिला डाव : आॅस्ट्रेलिया ५५१/३ घोषित
वेस्ट इंडीज २७१ सर्व बाद
दुसरा डाव :
आॅस्ट्रेलिया १७९/३ घोषित : जो बर्न्स ५, डेव्हिड वॉर्नर १७, उस्मान ख्वाजा ५६ : स्टिव्ह स्मिथ ७० नाबाद, मिशेल मार्श १८ नाबाद, गोलंदाजी : जेसन होल्डर ४९/२; कार्लोस ब्रेथवेट ३०/१,
वेस्ट इंडीज २८२ सर्व बाद : क्रेग ब्रेथवेट ३१, राजेंद्र चंद्रिका ३७, डॅरेन ब्रावो २१, दिनेश रामदीन ५९, जेसन होल्डर ६८; गोलंदाजी : जेम्स पॅटिन्सन ४९/२, नॅथन लियान ८५/३, पिटर सिडल ३५/१, मिशेल मार्श ६१/४