आॅस्ट्रेलिया बाद फेरीत
By Admin | Updated: March 9, 2015 09:33 IST2015-03-09T01:09:48+5:302015-03-09T09:33:59+5:30
ग्लेन मॅक्सवेलचे आक्रमक शतक व कुमार संगकाराचे विक्रमी शतक याचा साक्षीदार ठरलेल्या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात अखेर यजमान आॅस्ट्रेलियाने रविवारी श्रीलंकेचा

आॅस्ट्रेलिया बाद फेरीत
सिडनी : ग्लेन मॅक्सवेलचे आक्रमक शतक व कुमार संगकाराचे विक्रमी शतक याचा साक्षीदार ठरलेल्या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात अखेर यजमान आॅस्ट्रेलियाने रविवारी श्रीलंकेचा ६४ धावांनी पराभव करीत आयसीसी क्रिकेट विश्वकप स्पर्धेत बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला. मॅक्सवेलने विश्वकप स्पर्धेतील दुसरे सर्वात वेगवान शतक झळकावले. कारकीर्दीत प्रथमच शतक झळकावताना मॅक्सवेलने ५३ चेंडूंना सामोरे जात १०२ धावांची खेळी केली. त्यात १० चौकार व ४ षटकारांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त स्टिव्हन स्मिथ (७२), कर्णधार मायकल क्लार्क (६८) आणि शेन वॉटसन (६७) यांनी अर्धशतके झळकावली. आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी स्वीकारताना ९ बाद ३७६ धावांची दमदार मजल मारली.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेतर्फे कुमार संगकाराने (१०४) या स्पर्धेत तिसऱ्यांदा शतकी खेळी केली. यापूर्वी त्याने नाबाद १०५ व नाबाद ११७ धावांच्या खेळी केलेल्या आहेत. तिलकरत्ने दिलशान (६२) व दिनेश चंदीमल (रिटायर्ड हर्ट ५२) यांनी अर्धशतके झळकावण्याची कामगिरी केली. श्रीलंका संघाने एकवेळ आॅस्ट्रेलियन तंबूत चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. पण स्नायूच्या दुखापतीमुळे चंदीमलला मैदान सोडावे लागल्यानंतर चित्र बदलले. श्रीलंका संघाचा डाव ४६.२ षटकांत ३१२ धावांत संपुष्टात आला.
आॅस्ट्रेलियाचा पाच सामन्यांतील हा तिसरा विजय आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे एक सामना रद्द झाला. आॅस्ट्रेलियाच्या खात्यावर ७ गुणांची नोंद असून ‘अ’ गटात हा संघ न्यूझीलंडनंतर दुसऱ्या स्थानावर दाखल झाला आहे. पाच सामने खेळणाऱ्या श्रीलंका संघाचा हा दुसरा पराभव आहे. श्रीलंका संघाच्या खात्यावर ६ गुणांची नोंद असून, त्यांची तिसऱ्या स्थानी घसरण झाली.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका संघाची सुरुवात निराशाजनक झाली. लाहिरू थिरिमाने (१) दुसऱ्याच षटकात माघारी परतला. त्यानंतर संगकारा व दिलशान यांनी दुसऱ्या विकेटसाठी जवळजवळ २० षटकांत १३० धावांची भागीदारी केली. क्लार्कने दिलशानचा सोपा झेल सोडला. त्याला लाभ घेत दिलशानने ६० चेंडूमध्ये ६२ धावांची खेळी केली. त्यात ८ चौकारांचा समावेश आहे. दरम्यान, संगकाराने आज वन-डे क्रिकेट कारकीर्दीत १४ हजार धावांचा टप्पा ओलांडला. भारताच्या सचिन तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील दुसरा फलंदाज ठरला आहे. त्यानंतर संगकाराने वैयक्तिक शतक साकारले. विश्वकप स्पर्धेत सलग तीन शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. फॉकनरने संगकाराचा अडथळा दूर केला. संगकाराने १०७ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकार ठोकले. फॉकनरने त्यापूर्वी दिलशानला तंबूचा मार्ग दाखवीत ही भागीदारी संपुष्टात आणली होती. अनुभवी माहेला जयवर्धने (१९) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. संगकारा व जयवर्धने हे दोन्ही फलंदाज पॉवरप्लेमध्येबाद झाले. लंकेने २९ व्या षटकात पॉवर प्ले घेतला होता.
त्यानंतर युवा चंदीमलने २२ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी करीत श्रीलंकेच्या आशा कायम राखल्या. श्रीलंकेतर्फे विश्वकप स्पर्धेत हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. वन-डेमध्ये श्रीलंकेतर्फे सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम सनथ जयसूर्याच्या (१७ चेंडू) नावावर आहे. चंदीमल वैयक्तिक ५२ धावा फटकावल्यानंतर रिटायर्ड हर्ट झाल्यामुळे सामन्याचे चित्र बदलले. चंदीलमला ४२ व्या षटकात मैदान सोडावे लागले. त्याच षटकात वॉटसनने कर्णधार मॅथ्यूजला (३१ चेंडू, ३५ धावा) माघारी परतवले. त्यामुळे आॅस्ट्रेलियाचा विजय निश्चित झाला.
त्याआधी मॅक्सवेलने केवळ ५१ चेंडूंमध्ये शतक साकारले. आयर्लंडच्या केव्हिन ओब्रायनचा (५० चेंडू) विश्वकप स्पर्धेतील सर्वात वेगवान शतकाच्या विक्रमाची बरोबरी करण्यात तो अपयशी ठरला.
गेल्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध एक विकेटने पराभव स्वीकारणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाची सुरुवात आज निराशाजनक झाली. डेव्हिड वॉर्नर (९) झटपट माघारी परतला असला तरी, आॅस्ट्रेलियन फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. क्लार्क व स्मिथ यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी करीत, आॅस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येची मजबूत पायाभरणी करून दिली. (वृत्तसंस्था)