आॅस्ट्रेलिया अंतिम फेरीत
By Admin | Updated: January 24, 2015 01:33 IST2015-01-24T01:33:16+5:302015-01-24T01:33:16+5:30
आॅस्ट्रेलियाने इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव करीत तिरंगी वन-डे सामन्यांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

आॅस्ट्रेलिया अंतिम फेरीत
होबार्ट : स्टिव्हन स्मिथने (नाबाद १०२) प्रतिकूल परिस्थितीमध्ये कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आणि आॅस्ट्रेलियाने इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव करीत तिरंगी वन-डे सामन्यांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. इंग्लंडचा कर्णधार इयान बेलची (१४१) शतकी खेळी व्यर्थ ठरली.
आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीवन स्मिथने ९५ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १०२ धावा फटकाविल्या. त्यात ६ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. आॅस्ट्रेलियाने विजयासाठी आवश्यक धावा ४९.५ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या.
स्मिथच्या शतकी खेळीमुळे बेलच्या १४१ धावांच्या खेळीवर पाणी फेरल्या गेले. बेलने कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी केली, पण पराभव स्वीकारावा लागल्यामुळे अखेर ती व्यर्थच ठरली. आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंडच्या डावात बेल व्यतिरिक्त जो रुट (६९) व मोईन अली (४६) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. इंग्लंडने ५० षटकांत ८ बाद ३०३ धावांची दमदार मजल मारली.
अॅरोन फिंच (३२) व शॉन मार्श (४५) यांनी सलामीला ७६ धावांची भागीदारी करीत आॅस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर स्मिथने ग्लेन मॅक्सवेलसोबत (३७) चौथ्या विकेटसाठी ६९ धावांची, जेम्स फॉकनरसोबत (३५) पाचव्या विकेटसाठी ५५ धावांची तर ब्रॅड हॅडिनसोबत (४२) सहाव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. अखेरच्या क्षणी हॅडिन व मोएजेस हन्रिक्स (४) बाद झाल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली होती. मात्र, अखेर आॅस्ट्रेलियाने विजय निश्चित करत अंतिम फेरीत स्थान पक्के केले. (वृत्तसंस्था)