आॅस्ट्रेलियाला ‘क्लीन स्वीप’, भारत अव्वल स्थानी

By Admin | Updated: February 1, 2016 02:38 IST2016-02-01T02:38:55+5:302016-02-01T02:38:55+5:30

धावांच्या डोंगरासमोर न डगमगता कांगारूंना सळो की पळो करून टीम इंडियाच्या फलंदाजांनी त्यांच्याच भूमीत ऐतिहासिक क्लीन स्वीप दिला.

Australia 'clean sweep', India top position | आॅस्ट्रेलियाला ‘क्लीन स्वीप’, भारत अव्वल स्थानी

आॅस्ट्रेलियाला ‘क्लीन स्वीप’, भारत अव्वल स्थानी

टी-२० मालिका : आॅस्ट्रेलियाला ‘क्लीन स्वीप’, वॉटसनची शतकी खेळी व्यर्थ
सिडनी : रोहित शर्मा व विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीनंतर सुरेश रैनाच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने शेन वॉटसनची नाबाद शतकी खेळी व्यर्थ ठरवली आणि तिसऱ्या व अखेरच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आॅस्ट्रेलियाचा ७ गडी राखून पराभव केला. या निकालासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियाचा ३-० ने ‘क्लीन स्वीप’ करीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. भारत या मालिकेपूर्वी आठव्या स्थानी होता. टीम इंडिया या व्यतिरिक्त कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असून, वन-डे क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे.
आॅस्ट्रेलियाने दिलेल्या १९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने रोहित शर्मा (५२) आणि विराट कोहली (५०) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळींव्यतिरिक्त रैनाच्या (२५ चेंडू, नाबाद ४९ धावा) आक्रमक खेळीच्या जोरावर अखेरच्या चेंडूवर विजय साकारला. भारताने अखेरच्या चेंडूवर ३ गड्यांच्या मोबदल्यात २०० धावांची मजल मारली आणि विजयाला गवसणी घातली. टी-२० क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना हा तिसरा सर्वांत मोठा विजय ठरला. रैनाच्या खेळीत ६ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. भारताने आॅस्ट्रेलियात प्रथमच द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. रैनाने युवराज सिंगसोबत (१२ चेंडूंत नाबाद १५ धावा) चौथ्या विकेटसाठी ५.१ षटकांत ५३ धावांची अभेद्य भागीदारी केली.
भारताला अखेरच्या दोन षटकांत विजयासाठी २२ धावांची गरज होती, पण वॉटसनने (१-३०) १९व्या षटकात केवळ ५ धावा दिल्या त्यामुळे अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी १७ धावांची गरज होती. अखेरच्या षटकात अ‍ॅण्ड्य्रू टाय गोलंदाजीसाठी आला. युवराजने अखेरच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर अनुक्रमे चौकार व षटकार वसूल करीत १० धावा फटकावल्या. तिसऱ्या चेंडूवर बायची एक धाव घेतल्यानंतर रैनाने त्यानंतरच्या दोन चेंडूंवर प्रत्येकी २ धावा फटकावल्या आणि अखेरच्या चेंडूवर चौकार वसूल करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी, वॉटसनने मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करताना ७१ चेंडूंमध्ये ६ षटकार व १० चौकारांच्या सहाय्याने नाबाद १२४ धावा फटकावल्या. वॉटसनने टी-२० क्रिकेटमधील दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. वॉटसनच्या खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने ५ बाद १९७ धावांची मजल मारली. वॉटसनने शॉन मार्शसोबत (९) दुसऱ्या विकेटसाठी ५३ आणि ट्रेव्हिस हेडसोबत (२६) चौथ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली.
आॅस्ट्रेलियाच्या डावात वॉटसननंतर दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ट्रॅव्हिस हेडची (२६) ठरली. वॉटसन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतकी खेळी करणारा जगातील १५वा तर आॅस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज ठरला. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतकी खेळी करण्याचा पराक्रम करणारा तो आॅस्ट्रेलियाचा पहिला फलंदाज ठरला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात वॉटसनपेक्षा अधिक वैयक्तिक धावा फटकावण्याचा विक्रम आॅस्ट्रेलियाचा नियमित टी-२० कर्णधार अ‍ॅरोन फिंचच्या (१५६) नावावर आहे. फिंच दुखापतीमुळे या लढतीत खेळू शकला नाही.


लक्ष्याचा पाठलाग करताना भारतातर्फे शिखर धवन (२६) आणि रोहित शर्मा (५२) यांनी सलामीला ३.२ षटकांत ४६ धावांची भागीदारी केली. रोहितने टेटच्या गोलंदाजीवर चौकार वसूल करीत खाते उघडले आणि त्यानंतर त्याने स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवरही चौकार ठोकला. धवनने टेटच्या गोलंदाजीवर सलग चौकार ठोकल्यानंतर त्याच षटकात षटकारही ठोकला. त्या षटकात २४ धावा फटकावल्या गेल्या. धवनने वॉटसनच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला, पण त्यानंतरच्या चेंडूवर यष्टिरक्षक कॅमरुन बेनक्रॉफ्टकडे झेल देत माघारी परतला. त्यानंतर रोहित व कोहली यांनी आक्रमक फलंदाजी करीत भारताला १०व्या षटकांत १०० धावांचा पल्ला गाठून दिला. रोहितने मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर षटकार ठोकल्यानंतर बोलँडच्या गोलंदाजीवर चौकार व एक धाव घेत ३५चेंडूंमध्ये नववे अर्धशतक पूर्ण केले. रोहितला फिरकीपटू बॉयसने तंबूचा मार्ग दाखवला. दरम्यान, या अर्धशतकी खेळीदरम्यान रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत एक हजार धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी कोहली व सुरेश रैना यांनी हा पराक्रम केला आहे. (वृत्तसंस्था)
विजयाचे श्रेय गोलंदाजांना : धोनी
भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियाला ‘व्हाइट वॉश’ देण्याचे श्रेय गोलंदाजांना दिले आहे. गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्यामुळे यश मिळवता आले. वन-डे मालिकेत याची उणीव भासली, असे धोनी म्हणाला. धोनीने युवा जसप्रीत बुमराह आणि अनुभवी आशिष नेहरा यांची प्रशंसा केली.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ‘मालिका विजयाचे श्रेय बऱ्याच अंशी गोलंदाजांच्या कामगिरीला जाते. वन-डे मालिकेत फलंदाजांनी चांगली कामगिरी केली; पण गोलंदाजांकडून योग्य साथ लाभली
नाही. बुमराहच्या साथीला नेहराच्या अनुभवाची जोड मिळाली आणि गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीमुळे
यश मिळवता आले. फलंदाजांनी
चांगली कामगिरी केली, यात वाद नाही; पण गोलंदाजांच्या कामगिरीमुळे फरक पडला.’
भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्व
टी-२० स्पर्धेत जवळजवळ हाच संघ कायम राखणार असल्याचे धोनीने या वेळी संकेत दिले. धोनी म्हणाला,‘विश्व टी-२० स्पर्धेत परिस्थितीचा विचार एक किंवा दोन बदल होण्याची शक्यता आहे; पण सर्वसाधारण विचार करता आमचा टी-२० संघ असाच राहण्याची शक्यता आहे.’ उपकर्णधार आणि प्लेअर आॅफ द सिरीजचा मानकरी ठरलेल्या विराट कोहलीने दौऱ्याचा शेवट गोड झाल्यामुळे आनंद व्यक्त केला.
> संक्षिप्त धावफलक
आॅस्ट्रेलिया :- उस्मान ख्वाजा झे. धोनी गो. नेहरा १४, शेन वॉटसन नाबाद १२४, शॉन मार्श त्रि. गो. अश्विन ०९, ग्लेन मॅक्सवेल झे. रैना गो. युवराज ०३, ट्रॅव्हिस हॅड त्रि.गो. जडेजा २६, ख्रिस लिन झे. जडेजा गो. बुमराह १३, कॅमरुन बेनक्रॉफ्ट नाबाद ००. अवांतर (०८). एकूण २० षटकांत ५ बाद १९७. बाद क्रम : १-१६, २-६९, ३-७५, ४-१६८, ५-१९३. गोलंदाजी : नेहरा ४-०-३२-१, बुमराह ४-०-४३-१, आश्विन ४-०-३६-१, जडेजा ४-०-४१-१, युवराज २-०-१९-१, पांड्या २-०-२४-०.
भारत :- रोहित शर्मा झे. वॉटसन गो. बॉयस ५२, शिखर धवन झे. बेनक्रॉफ्ट गो. वॉटसन २६, विराट कोहली त्रि. गो. बॉयस ५०, सुरेश रैना नाबाद ४९, युवराज सिंग नाबाद १५. अवांतर (०८). एकूण २० षटकांत ३ बाद २००. बाद क्रम : १-४६, २-१२४, ३-१४७. गोलंदाजी : टेट ४-०-४६-०, बोलँड ३-०-३४-०, वॉटसन ४-०-३०-१, टाय ४-०-५१-०, बॉयस ४-०-२८-१, मॅक्सवेल १-०-१०-०.
>आॅस्ट्रेलियन भूमीवर क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमेटमध्ये टीम इंडियाचाहा पहिला
‘क्लीन स्वीप’ आहे. कसोटी, वन-डे आणि टी-२० या तिन्ही प्रकारांत भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेत आॅस्ट्रेलियन भूमीवर आतापर्यंत ५४ सामने खेळविण्यात आले. त्यात भारताने ९ विजय नोंदवले, तर ३४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ११ सामने अनिर्णित राहिले.
आॅस्ट्रेलियावर क्लीन स्वीप करीत भारताने टी-२० रॅँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठले. टी-२० विश्वचषक सुरू होण्याच्या एक महिन्यापूर्वी नंबर वन झाल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. मालिकेत तीन अर्धशतके झळकाविणाऱ्या विराट कोहलीने नवा विक्रम रचला.अर्धशतकी हॅट्ट्रिक साधणारा तो जगातील एकमात्र खेळाडू ठरला. विश्वचषकापूर्वी विराटने मिळवलेला फॉर्म मात्र प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.
भारतीय गोलंदाजी थोड्या प्रमाणात प्रभावी ठरली. त्यामुळेच भारताच्या चार गोलंदाजांनी सर्वाधिक बळी मिळणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवले. यामध्ये आॅस्ट्रेलियाचा शेन वॉटसन पाचव्या क्रमांकावर आहे. जसप्रीत बुमराह हा चमकला. रवींद्र जडेजा आणि आश्विन यांनी आॅस्ट्रेलियन पीचवर कमाल केली. आता आशियाई पीचवर त्यांची गोलंदाजी कशी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title: Australia 'clean sweep', India top position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.