आॅस्ट्रेलिया व भारत ‘अ’ संघांदरम्यान लढत
By Admin | Updated: July 21, 2015 23:45 IST2015-07-21T23:45:17+5:302015-07-21T23:45:17+5:30
बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारत ‘अ’ संघ बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या दोन सामन्यांच्या

आॅस्ट्रेलिया व भारत ‘अ’ संघांदरम्यान लढत
चेन्नई : बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारत ‘अ’ संघ बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सराव सामना आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध खेळणार आहे.
नवे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारत ‘अ’ संघ बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या मालिकेच्या निमित्ताने भारतासाठी क्रिकेटपटूंची मोठी फळी निर्माण करण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयच्या सध्याच्या तांत्रिक समितीने भारत ‘अ’ संघाच्या दौऱ्यांवर विशेष भर दिला आहे. कारण त्यामुळे सिनिअर संघासाठी भविष्यातील क्रिकेटपटू शोधण्यास मदत मिळणार आहे. भारत ‘अ’ संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर द्रविडने स्पष्ट केले होते, की गोलंदाजांमध्ये २० बळी घेण्याची आणि फलंदाजांमध्ये खेळपट्टीवर तळ ठोकण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजारा करणार आहे. कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेल्या पुजाराला लवकरच सूर गवसेल अशी आशा आहे. इंग्लंड व आॅस्ट्रेलियामध्ये निराशाजनक कामगिरीनंतर पुजाराला बांगलादेशविरुद्ध अलीकडेच खेळल्या गेलेल्या मालिकेत संधी मिळाली नव्हती. पुजाराने यापूर्वी दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिजविरुद्ध ‘अ’ संघाचे नेतृत्व केलेले आहे. पुजाराला आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध आपली नेतृत्वक्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. भारतीय संघात युवा व अनुभवी खेळाडूंचा समावेश असून, मायदेशात चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहेत.
पुजाराव्यतिरिक्त के. एल. राहुल, अभिनव मुकुंद, फिरकीपटू अमित मिश्रा आणि प्रग्यान ओझा यांनाही आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची ही चांगली संधी आहे. वेगवान गोलंदाज वरुण अॅरोन व उमेश यादव सिनिअर संघातील आपले स्थान पक्के करण्यास उत्सुक आहेत. संघाची तुलना करताना भारताचा संघ समतोल आहे. आघाडीची फळी मजबूत असून अॅरोन, यादव आणि अभिमन्यू मिथुन यांच्या समावेशामुळे वेगवान गोलंदाजीमध्ये विविधता आहे. फिरकीची जबाबदारी सांभाळण्यास अमित मिश्रा सज्ज असून, त्याची साथ देण्यासाठी ओझा आहे. (वृत्तसंस्था)