अ‍ॅथलिट पुरस्कार : ललिता, टिंटू, विकासला रोख पारितोषिक

By Admin | Updated: June 9, 2015 02:18 IST2015-06-09T02:18:08+5:302015-06-09T02:18:08+5:30

ललिता बाबर, टिंटू लुका, विकास गौडा आणि इंदरजितसिंग यांना क्रीडा मंत्रालयाद्वारे प्रत्येकी साडेसात लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Athletes Prizes: Lalita, Tintu, Cash Prize in Development | अ‍ॅथलिट पुरस्कार : ललिता, टिंटू, विकासला रोख पारितोषिक

अ‍ॅथलिट पुरस्कार : ललिता, टिंटू, विकासला रोख पारितोषिक

नवी दिल्ली : चीनच्या वुहान शहरात नुकत्याच झालेल्या २१व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णविजेते खेळाडू ललिता बाबर, टिंटू लुका, विकास गौडा आणि इंदरजितसिंग यांना क्रीडा मंत्रालयाद्वारे प्रत्येकी साडेसात लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार भारताने या स्पर्धेत खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ असे ५९ जणांचे पथक पाठविले होते. खेळाडूंनी चार सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई करून तिसरे स्थान पटकावले होते. ललिता बाबर हिने तीन हजार मीटर स्टीपल चेसमध्ये सुवर्ण पदकासह रिओ आॅलिम्पिकचे तिकीटही पक्के केले. टिंटूने ८०० मीटरमध्ये, विकास गौडा याने थाळीफेकीत तसेच इंदरजितसिंग याने गोळाफेकीत सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या ४०० मीटर दौडीत रौप्यविजेती एम. आर. पुवम्मा, दहा हजार मीटर दौडीचा रौप्यविजेता जी. लक्षमणन, हेप्टथॉलनमधील रौप्यविजेती लिक्सी जोसेफ, ८०० मीटर पुरुष दौडीचा रौप्य विजेता जिन्सन जॉन्सन आणि २०० मीटरचा रौप्यविजेता धर्मवीर यांना प्रत्येकी ५ लाख रुपये मिळणार आहेत.
महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले दौडीत रौप्यविजेत्या संघातील देवश्री मुजुमदार, टिंटू लुका, जिस्त्रा मॅथ्यू आणि एम. आर. पुवम्मा यांनादेखील प्रत्येकी ५ लाख रुपये दिले जाणार आहेत. भारताच्या तीन खेळाडू कांस्यपदकाच्या मानकरी ठरल्या. सर्वांना प्रत्येकी अडीच लाखांचा पुरस्कार दिला जाईल. या खेळाडूंमध्ये जी. लक्ष्मणन् (पाच हजार मीटर दौड), पौर्णिमा (हेप्टाथॉलन) आणि श्रावणी नंदा (२०० मीटर दौड) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Athletes Prizes: Lalita, Tintu, Cash Prize in Development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.