आजपासून रंगणार आशियाई चुरस
By Admin | Updated: July 6, 2017 01:52 IST2017-07-06T01:52:39+5:302017-07-06T01:52:39+5:30
गुरुवारपासून येथे सुरू होत असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी यजमान भारतीय संघ सज्ज असून, स्पर्धेत चमकदार

आजपासून रंगणार आशियाई चुरस
भुवनेश्वर : गुरुवारपासून येथे सुरू होत असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी यजमान भारतीय संघ सज्ज असून, स्पर्धेत चमकदार कामगिरी करून पदकतालिकेत अव्वल तिनांमध्ये स्थान पटकावण्याचे लक्ष्य यजमानांनी ठेवले आहे. विशेष म्हणजे, ऐन वेळी रांची शहराने या स्पर्धेच्या आयोजनातून माघार घेतल्यानंतरही भुवनेश्वर येथे अव्वल दर्जाच्या सोयीसुविधा देण्यात यजमान यशस्वी ठरले.
ओडिशाच्या राजधानी शहरात या स्पर्धेच्या निमित्ताने ४५ देशांतील सुमारे ८००हून अधिक अॅथलिट येणार असून ४२ खेळांत आपले कौशल्य दाखवतील.
यंदाच्या स्पर्धेतही काही अव्वल खेळाडूंची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवेल. दर वर्षीप्रमाणे यंदाही अनेक अव्वल अॅथलिटनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. त्यामुळे दर दोन वर्षांनी होत असलेल्या या स्पर्धेत यंदाही ग्लॅमरची कमतरता जाणवेल. दखल घेण्याची बाब म्हणजे, या स्पर्धेनंतर लगेच लंडनमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होणार असल्याने अव्वल खेळाडूंनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.(वृत्तसंस्था)
यजमानांच्या कामगिरीकडे लक्ष...
१ जागतिक स्तरावर नेहमी कमजोर स्थिती राहिलेल्या भारताने आशियाई स्पर्धांमध्ये मात्र मजबूत स्थान मिळविले आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासामध्ये सर्वाधिक पदके मिळविण्याच्या यादीमध्ये भारताने चीन व जपाननंतर तिसरे स्थान मिळविले आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी यजमान देशाने ९५ सदस्यांचा संघ निवडला असून त्यामध्ये ४६ महिला खेळाडूंचा समावेश आहे. यंदाच्या स्पर्धेत भारताने सर्वांत मोठा संघ पाठविला आहे.
२वुहानमध्ये झालेल्या गेल्या वेळच्या स्पर्धेत भारताने चार सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्य अशा १३ पदकांसह स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले होते. यंदा मात्र भारताला कामगिरीत आणखी सुधारणा होण्याची आशा आहे. भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने कमीत कमी ५ सुवर्णांसह १५ ते २० पदके जिंकण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
ओडिशाचा इतिहास आणि संस्कृती यांच्या अप्रतिम सादरीकरणासह आधुनिक आर्थिक विकासाचे रंग उधळताना २२व्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी कलिंगा स्टेडियममध्ये आशियाई स्पर्धा सुरू झाल्याची घोषणा केली. या वेळी आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सेबेश्चियन को आणि आशियाई संघटनेचे प्रमुख दहलन अल हमद यांचीही उपस्थिती होती.
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला आणि क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री पटनाईक यांनी स्पर्धा उद्घाटनाची घोषणा केल्यानंतर आशियाई अॅथलेटिक्स महासंघटनेचा झेंडा फडकावला.