Asia Cup Hockey India vs South Korea: राजगिर (बिहार) : यजमान भारताला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर लढतीत बुधवारी गतविजेत्या दक्षिण कोरियाविरुद्ध २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. पहिल्या दहा मिनिटांमध्येच गोल करूनही भारतीयांनी मिळवलेली पकड गमावली. दक्षिण कोरियाने शानदार वेगवान खेळ करताना बलाढ्य भारताला बरोबरीत रोखले. भारतीय संघ आता गुरुवारी मलेशियाच्या कडव्या आव्हानला सामोरे जाईल.
पावसाच्या आगमनामुळे हा सामना उशीराने सुरू झाला. आक्रमक सुरुवात केलेल्या भारताने सुरुवातीपासून आपले इरादे स्पष्ट केले. हार्दिक सिंगने जबरदस्त वेग पकडताना आठव्या मिनिटाला पहिला गोल करीत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र, कोरियाने भारतीयांचा हा आनंद फार काळ टिकू दिला नाही. त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना सहा मिनिटांमध्ये दोन गोल करीत सामन्याचे चित्र पालटले. जिहून यांगने १२व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल करीत कोरियाला बरोबरी साधून दिल्यानंतर १४व्या मिनिटाला हेयॉनहाँग किम याने गोल करीत कोरियाला २-१ असे आघाडीवर नेले.
कोरियाने चौथ्या क्वार्टरपर्यंत सामन्यावर वर्चस्व राखले होते; परंतु भारतीयांनी कमालीची मुसंडी मारत कोरियावर दडपण आणले आणि यामुळे त्यांच्याकडून झालेल्या चुकीचा फायदा घेत मनदीप सिंगने ५२व्या मिनिटाला महत्त्वपूर्ण मैदानी गोल करीत भारताला २-२ अशी बरोबरी साधून दिली. ही बरोबरी नंतर अखेरपर्यंत कायम राहिल्याने सामना बरोबरीत सुटला. दरम्यान, पुन्हा एकदा भारतीयांना पेनल्टी कॉर्नरच्या संधी दडविल्याचा फटका बसला. या सामन्यात तब्बल ६ पेनल्टी कॉर्नर मिळवल्या; पण एकदाही भारताला गोल करता आला नाही. दुसरीकडे, कोरियाने दोनपैकी एक पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावली. भारताला आता पुढील सामन्यांत पेनल्टी कॉर्नरवरील कौशल्य सुधरावेच लागेल.
पावसामुळे झाला उशीर
पावसाने हजेरी लावल्यामुळे भारत-कोरिया सामना जवळपास तासभर उशीराने सुरू झाला. पावसाचा जोर जास्त असल्याने सामना सुरू करणे शक्य झाले नाही. यामुळे खेळाडूंनाही मैदान सोडावे लागले.
मलेशियाचा शानदार विजय
सुपर फोर गटातील पहिल्या सामन्यात मलेशियाने झुंजार खेळ करत चीनचे कडवे आव्हान २-० असे परतवले. चीनने जबरदस्त प्रतिकार करताना बलाढ्य मलेशियाला सहजासहजी वर्चस्व मिळवू दिले नाही. पहिले दोन क्वार्टर गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर मलेशियाने तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये प्रत्येकी एक गोल केला. सय्यद चोलन याने ४५व्या मिनिटाला गोल करून मलेशियाला आघाडीवर नेले. यानंतर अखेरच्या क्वार्टरमध्ये ४७व्या मिनिटाला अकिमुल्लाह अनौर याने गोल करत मलेशियाचा दुसरा गोल नोंदवत संघाचा विजय स्पष्ट केला. मलेशियाला आता गुरुवारी यजमान भारताविरूद्ध, तर चीन कोरियाविरुद्ध खेळेल.
आक्रमक जपानने चिनी तैपईचे आव्हान परतवले
पाचव्या ते आठव्या स्थानांसाठी झालेल्या नॉन-पूल स्टँडिंग गटात जपानने पहिला सामना जिंकताना चिनी तैपईला २-० असे नमवले. जपानने बाजी मारली असली, तरी त्यांना चिनी तैपईविरुद्ध मोठा विजय मिळवता आला नाही. रोस्युके शिनोहारा याने सामन्यातील दोन्ही गोल नोंदवत जपानच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. शिनोहाराने पाचव्या आणि अकराव्या मिनिटाला गोल नोंदवले. चिनी तैपईच्या आक्रमकांना अखेरपर्यंत जपानचा भक्कम बचाव भेदता आला नाही.