अश्विन वर्ल्ड नंबर २

By Admin | Updated: December 1, 2015 03:23 IST2015-12-01T03:23:18+5:302015-12-01T03:23:18+5:30

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेत फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणारा भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आयसीसीतर्फे सोमवारी जाहीर

Ashwin World No. 2 | अश्विन वर्ल्ड नंबर २

अश्विन वर्ल्ड नंबर २

दुबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेत फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणारा भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आयसीसीतर्फे सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या कसोटी गोलंदाजांच्या मानांकनामध्ये तीन स्थानाने प्रगती करताना कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
अश्विनसह डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि लेग स्पिनर अमित मिश्रा यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन पटकावले. या तीन फिरकीपटूंच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानावर खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळविला तर मानांकनामध्ये टीम इंडियाला दुसऱ्या स्थानावर दाखल होण्याची संधी राहील.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत एकूण १२ बळी घेत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या अश्विनला चमकदार कामगिरीचे गिफ्ट मिळाले आहे. अश्विन कसोटी मानांकनामध्ये ८५६ मानांकन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. यापूर्वी अश्विन ८०६ मानांकन गुणांसह पाचव्या स्थानी होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीमुळे अश्विनला ५० मानांकन गुणांचा लाभ झाला आहे.
नागपूर कसोटी सामन्याला मुकलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला ९ मानांकन गुणांचे नुकसान सोसावे लागले आहे, पण तो ८८४ मानांकन गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. अश्विनच्या मानांकनातील स्थानात सुधारणा झाल्यामुळे पाकिस्तानचा लेग स्पिनर यासिर शाह आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अ‍ॅण्डरसन (प्रत्येकी ८४६ मानांकन गुण) यांची संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे, तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. अश्विनव्यतिरिक्त जडेजा आणि मिश्रा यांनाही चमकदार कामगिरीचे गिफ्ट मिळाले आहे. जडेजाला दोन स्थानांचा लाभ झाला असून तो ६९३ मानांकन गुणांसह कारकिर्दीतील सर्वोत्तम ११ व्या स्थानी पोहोचला आहे, तर अमित मिश्राने तीन स्थानांची प्रगती करताना ४२६ मानांकन गुणांसह कारकिर्दीतील सर्वोत्तम ३१ व्या स्थानी धडक दिली आहे.

 

Web Title: Ashwin World No. 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.